
बेळगाव : जगात करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्रे आहेत. मात्र आम्ही मोजक्याच क्षेत्रात गुरफटलो आहोत. करिअर निवडताना आत्मविश्वासाने सामोर जावे. ज्ञानाबरोबर व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे कॉलेजमधूनच मिळायला हवेत असे मत ज्येष्ठ पत्रकार गोपाळ गावडा यांनी व्यक्त केले.
विश्वभारत सेवा समितीच्या पंडीत नेहरु पीयु कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, आज प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. मात्र, मोजक्याच विद्यार्थ्यांकडे डिक्शनरी आहे. टीव्ही पाहू नका, असे मी अजिबात म्हणणार नाही. कारण शाळा, कॉलेजमध्ये जी माहिती मिळत नाही ती टीव्हीवरील बातम्या, कार्यक्रम, सिनेमा पाहिल्यामुळे मिळते. आपल्या मेंदूला विचार करण्याची सवय लावा. कॉलेजमध्येच व्यक्तिमत्त्व विकास, करिअर मार्गदर्शन वर्ग राबवले पाहिजेत. विश्वभारत सेवा समितीचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात पोहचवण्याचे कार्य या संस्थेने केले आहे.

अध्यक्षस्थानी एन. एफ. कटांबळे होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रियांका एच. या विद्यार्थिनीच्या नृत्याने झाली. व्यासपीठावर विश्वभारत सेवा समितीचे सचिव प्रकाश नंदीहळ्ळी, प्रमुख पाहुण्या भारती वाडवी, विकास कलघटगी, प्राचार्या ममता पवार उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून वर्षभरात विविध स्पर्धांत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले. आदर्श विद्यार्थिनी म्हणून श्रुती पाटील हिचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. मयूर नागेनहट्टी यांनी केले. व्ही. व्ही. डिचोलकर यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta