
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जाणार आहे. या मराठी भाषा दिनाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्लीचे प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत तर ज्योती महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक सुरेश पाटील हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने बेळगाव सीमा भागातील इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीच्या मुलांसाठी शिवचरित्रावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी मराठी विद्यानिकेतन येथे आयोजित करण्यात आली आहे.
27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन हा साठे प्रबोधिनी तर्फे साजरा केला जाणारा 27 वा मराठी भाषा दिन आहे. या निमित्ताने भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता शिक्षकांसाठी “शिक्षकांचे कर्तव्य” याविषयी डॉ शरद बाविस्कर यांचे व्याख्यान आहे. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पालकांसाठी “माझी जडणघडण” या विषयावरती डॉ. शरद बाविस्कर मांडणी करणार आहेत तर संध्याकाळी पाच वाजता बेळगाव परिसरातील मराठी भाषिकांसाठी “अभिजात मराठी भाषा व माझा भाषिक प्रवास” या विषयावर डॉ. बाविस्कर व्याख्यान देणार आहेत. तर या मराठी भाषा दिनाला बेळगाव परिसरातील बहुसंख्य मराठी भाषा प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी केले आहे. या बैठकीला प्रबोधिनीचे सदस्य सुरेश गडकरी, विजय बोंगाळे, मालोजी अष्टेकर, बी. बी. शिंदे, नीला आपटे, हर्षदा सुंठटणकर, अशोक अलगोंडी, नारायण उडकेकर, गजानन सावंत, इंद्रजीत मोरे, धीरजसिंह राजपूत, उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta