संजीवीनी फौंडेशनचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
बेळगाव : बेळगाव आणि परिसरातील मी अनेक संस्थाना भेटी दिल्या आहेत पण संजीवीनी काळजी केंद्रात एक कौटुंबिक वातावरण पहायला मिळते, इथे प्रत्येक सणवार मोठया प्रमाणात साजरे केले जातात.
आज काळजी केंद्रात वास्तव्यास असलेले सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित फॅमिली गेटटूगेदर ही संकल्पनाही नविन वाटल्याचे मत उमासंगीत प्रतिष्ठान व क्रांती महिला मंडळाच्या संस्थापिका मंगला मठद यांनी मांडले.
आयएमईआर कॉलेजच्या सभागृहात संजीवीनी फौंडेशनच्या फॅमिली गेटटूगेदर या कार्यक्रम प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ, चेअरमन आणि सीईओ मदन बामणे तसेच दुसरे प्रमुख पाहुणे किशोर काकडे होते.
नागचंपा यांच्या गणेशवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
संस्थेचे संचालक अजित देगीनाळ यांनी किशोर काकडे याना तर संध्या देगीनाळ यांनी मंगला मठद यांना शाल, स्मृतिचिन्ह, भेटवस्तू आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले.
प्रास्ताविक आणि स्वागत करताना मदन बामणे यांनी रुग्णांसाठी वर्षभर अनेक उपक्रम राबवीत असताना त्यांच्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन भरवून त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा या उद्देशाने आजचा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले.
यावेळी किशोर काकडे यांनीही आपल्या ओघवत्या शैलीत उपक्रमाचे कौतुक करून उपस्थिताना मार्गदर्शन केले.
त्यानंतर यावर्षी घेण्यात आलेल्या वार्षिक क्रीडास्पर्धेतील विजेत्यांना व्यासपीठावरील मान्यवर तसेच उपाध्यक्ष सुधा देगीनाळ, डॉ. अनिल पोटे, आश्रय फौंडेशनच्या सफला नागरत्ना, निर्मिती ग्रामीण अभिवृद्धीच्या डॉ. मधुरा गुरव, संजय पाटील व डॉ. तेजस्विनी कोकितकर यांच्याहस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. यानंतर काळजी केंद्रात वास्तव्यास असलेल्या वीसवर्षापासून ते चौऱ्यानौ वर्षांपर्यंतच्या रुग्णांनी तसेच कर्मचाऱ्यांनी विविध सामूहिक नृत्ये तसेच बहारदार गाणी गायिली. यावेळी ९१ वर्षाच्या बानुताई जोशी आज्जींच्या नाट्यगीताने साऱ्यांची वाहवा मिळवली. एकूणच एक कौटुंबिक सोहळा संपन्न झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. या भरगच्च कार्यक्रमास संचालिका रेखा बामणे सल्लागार सदस्या डॉ. सुरेखा पोटे, डॉ. नविना शेट्टीगार, विद्या सरनोबत तसेच सर्वच रुग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात हजर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्वीनी सोमसाळे(तम्मूचे) यांनी तर आभार सुनिल चन्नदासर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta