बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक हटविल्यानंतर पोलिसांनी जनतेलाच अमानुष मारहाण केली होती. तसेच त्यांच्यावर वेगवेगळे सात खटलेही दाखल केले. त्यामधील एका खटल्यातील ३९ कार्यकर्त्यांची द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने शुक्रवारी (दि. २८) निर्दोष मुक्तता केली.
येळ्ळूरच्या वेशीत वर्षानुवर्षे उभा असलेला ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हटविण्यासाठी कन्नड दुराभिमान्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने तो फलक हटविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार २५ सप्टेंबर २०१४ रोजी तो फलक हटविण्यात आला. त्यानंतर पुन्हा त्याच दिवशी येळ्ळूरच्या जनतेने पुन्हा फलक उभारला. तसेच येळ्ळूर-वडगाव रस्त्यावर झाडे व दगड माती टाकली होती. पोलिसांनी रस्त्यावरील सर्व अडथळे दूर करून तो फलकही हटविला. याप्रकरणी होळ्याप्पा भिमाप्पा सुलधाळने रा. मार्कंडेयनगर) बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी ४३ जणांवर भादंवि १४३, १४७, १४८, ३४१, १८८ सहकलम १४९ अन्वये गुन्हा दाखल केला होता. द्वितीय जेएमएफसी न्यायालयात सुनावणी होऊन साक्षी व कागदपत्रे पुरावे तपासण्यात आले. मात्र, सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करता आला नाही. यामुळे न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात कुमार मासेकर, सागर पाटील, केदारी पाटील, प्रकाश कुगजी, उमेश कुगजी, अशोक कुगजी, अभिजीत नायकोजी, शामल जाधव, मालन जाधव, सरिता जाधव, शांता कुगजी, अर्चना जाधव, शेवंता कुगजी, तुळसा शिंदे, लक्ष्मी राजाराम, सविता खादरवाडकर, परशुराम कुगजी, नंदू कुगजी, जयश्री खादरवाडकर, लक्ष्मी पोटे, सुनिता मुतगेकर, मनिषा टक्केकर, अंजना घाडी, सुनिता धामणेकर, नितीन कुगजी, राहुल अष्टेकर, रेखा संभाजीचे, ललिता संभाजीचे, सरस्वती कलमठ, लक्ष्मी कुगजी, गंगव्वा चिकमठ, रेणुका हंप्पणावर, महेश यादव, रेखा हंप्पण्णावर, रेश्मा मासेकर, अर्चना कुगजी, सविता चिकमठ, रेखा नंदी, नंदा बेडके यांच्यासह मयत मनोज नायकोजी, मिरा नायकोजी सुनील कुगजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर संपत कुगजी यांचे नाव वगळण्यात आले. यामुळे एकूण ३९ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्वांच्या वतीने ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. शाम पाटील, ऍड. हेमराज बेंचण्णावर यांनी काम पाहिले.
Belgaum Varta Belgaum Varta