बेळगाव : बेळगाव महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यामध्ये अर्थस्थायी समितीच्या अध्यक्षा नेत्रावती भागवत यांनी १० लाख ३५ हजार रुपये बचतीचे अंदाजपत्रक सादर केले. तसेच महापालिकेकडे थकीत निधी जमा करून प्रत्येक प्रभागाच्या विकासासाठी १० कोटी रुपये देण्याची घोषणा केली.
आज बेळगाव महापालिकेत महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पाचे सादरीकरण झाले. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर आनंद चव्हाण, महापालिका आयुक्त शुभा. बी. आदी अधिकारी उपस्थित होते.
२०२५-२६ च्या आर्थिक वर्षासाठी महानगरपालिकेचे एकूण उत्पन्न ४४१ कोटी ९९ लाख ४३ हजार रुपये असून, एकूण खर्च ४४१ कोटी ८९ लाख ८ हजार रुपये अंदाजित आहे. अशा प्रकारे चालू वर्षात १० लाख ३५ हजार रुपये बचत होण्याची अपेक्षा आहे.
वृद्ध नागरिक, मागास वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, शाळकरी मुले आणि दिव्यांगांच्या फायद्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील चौक, रस्ते आणि बस स्थानकांचे सौंदर्यीकरण हे प्रमुख प्रकल्प आहेत.
शहरातील दररोजच्या वाहतूक रहदारीचा ताण कमी करण्यासाठी रिकाम्या जागा पार्किंग आणि बाजारांसाठी रूपांतरित करून पालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने योजना आखण्यात आली आहे, असे भागवत यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta