Wednesday , December 10 2025
Breaking News

दिल्लीच्या तख्तावर सीमावासीयांच्या व्यथा

Spread the love

 

 

सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या ज्वलंत कवितांना उत्स्फूर्त दाद

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे दिमाखात पार पडले. या संमेलनात बेळगाव, खानापूर, बिदर आणि भालकी येथील सीमाभागातील कवींनी मराठी अस्मिता, सीमावासीयांच्या वेदना आणि संघर्षाचा बुलंद आवाज दिल्लीत पोहोचवला.

सीमाकवी रवींद्र पाटील यांनी आपल्या “माय”, “झुंज”, आणि “सीमेची घुसमट” या कवितांद्वारे सीमावासीयांच्या व्यथा प्रखरपणे मांडल्या. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने हेलावली. दिल्लीच्या तख्तावर सीमाभागातील अस्मितेचा हुंकार घुमला.

संमेलनात मराठी अस्मितेचा जागर

संमेलनात “छत्रपती संभाजी महाराज विचारपीठ खुले काव्यसंमेलन” या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. संयोजक डॉ. शरद गोरे यांनी आपल्या प्रभावी निवेदनाने संमेलनाची रंगत वाढवली. या काव्यसंमेलनात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील २६० कवींना आपल्या कविता सादर करण्याची संधी मिळाली. या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी युवराज नळे होते.

संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर होत्या. विशेष अतिथी म्हणून खासदार सुप्रिया सुळे, आयएएस अधिकारी रोहिणी भाजीभाकरे, ‘सरहद’चे संजय नहार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

खासदार सुप्रिया सुळे यांनी सीमाभागातील मराठी अस्मिता आणि संघर्षाला पाठिंबा जाहीर करत सीमाकवी रवींद्र पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

या संमेलनात रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सीमाभागातील नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ मिळाले. त्यांच्या सहभागामुळे सीमावासीयांच्या व्यथा, मराठी अस्मिता आणि संस्कृतीचे संवर्धन मोठ्या स्तरावर पोहोचले. या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी युवराज नळे, विक्रम शिंदे, अमोल कुंभार, रमेश रेडेकर आणि बाळासाहेब तोरसकर होते. या संमेलनामुळे बेळगावच्या मराठी साहित्य चळवळीला नवसंजीवनी मिळाली, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. सीमेपलीकडेही मराठीची पताका उंचावत, मराठी भाषेचा संघर्ष दिल्लीपर्यंत पोहोचवणाऱ्या सीमाकवींनी आपली भूमिका ठामपणे मांडली!

About Belgaum Varta

Check Also

भोवी-वडर समाजाच्या विकासासाठी बेळगावात आज नेते मंडळींचे मार्गदर्शन

Spread the love  निपाणी (वार्ता) : भोवी-वडर समाज विकास निगममधून समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *