बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करून पाच कोटी रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणाबाबत आता व्यापारी बसवराज अंबी यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा माझ्या अपहरणाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील राजापूर गावात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, माझ्या अपहरणाशी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा काहीही संबंध नाही. त्या दिवशी मी सांगलीला गाडी दुरुस्त करायला गेलो होतो. मी चिक्कोडीकडे येत असताना मला अडवून माझे अपहरण केले. गोवा घाटात गाडी ढकलण्याची धमकी देत घरी फोन करून 5 कोटींची मागणी केली. दिवसातून तीन ते चार गाड्या बदलल्या. त्यांनी मला कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यांत फिरवले. पोलिसांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. राजापूरमध्ये अपहरण झालेल्या बसवराज अंबीने सांगितले की, मी माझ्या पत्नीला पैसे तयार करण्यास सांगितले आणि पोलिसांनी लोकेशनच्या आधारे मला शोधून काढले आणि माझी सुटका केली.