बेनकनहळ्ळी स्थित घरकुल वृद्धाश्रम येथील श्री दत्त देवस्थानचे पुजारी श्री उल्हास अनंत जोशी हे नुकतेच आपल्या टीव्हीएस XL१०० दुचाकीवरून ४५०० किमी प्रवास करून प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यास जाऊन आले. महाकुंभ येथे आलेले त्यांचे अनुभव प्रत्यक्ष त्यांच्याचकडून ऐकण्यासाठी रविवारी सायंकाळी घरकुल वृद्धाश्रम येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी घरकूलचे अध्यक्ष राजीव पोतदार यांनी स्वागत केले. सचिव एन्. बी. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. विनायक मोरे यांनी प्रार्थना म्हटली. व्यवस्थापिका संध्या यांनी परिचय करून दिला. मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. त्यानंतर सौ लक्ष्मी पोतदार यांनी श्री जोशी यांची प्रकट मुलाखत घेतली.
महाकुंभमेळ्याचे शास्त्रोक्त महत्त्व, बेळगाव ते प्रयागराज दुचाकीवरून जाण्याचे कारण, प्रेरणा, वाटेत आलेले अनेक अनुभव, महामार्ग, प्रशासनाचे भव्यदिव्य नेटके नियोजन, राहण्या-खाण्याची व्यवस्था, संगम परिसरात स्वच्छतेसाठी उभारलेली यंत्रणा, परतीचा प्रवास अशा अनेक प्रश्नांवर जोशीबुवांनी आपले स्वानुभव प्रकट केले. उपस्थितांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांनाही त्यांनी समर्पक उत्तरे दिली व प्रत्येकाने एकवार अवश्य त्याठिकाणी भेट द्यावी, असे सांगितले.
अध्यक्ष राजीव पोतदार आणि सचिव नामजी देशपांडे यांच्या हस्ते श्री. उल्हास जोशींचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी घरकुलचे आजी-आजोबा यांच्यासह जयंत जोशी, निमंत्रित बहुसंख्येने उपस्थित होते.