Sunday , March 16 2025
Breaking News

कारागृहातील मोबाईल जामर विरोधात हिंडलगा ग्रामस्थांचा रास्ता रोको

Spread the love

 

बेळगाव : हिंडलगा परिसरातील जनजीवनावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत असल्यामुळे हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहातील मोबाईल जामरची वाढवलेली रेडियस क्षमता कमी करावी अशी वारंवार मागणी करून देखील कारागृह व्यवस्थापन त्याची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ हिंडलगा ग्रामपंचायतीचे नाराज पदाधिकारी, विविध संघटना आणि गावकरी यांच्यातर्फे कारागृहासमोरील मुख्य रस्त्यावर आज मंगळवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मध्यवर्तीय कारागृहात यापूर्वी एकाच ठिकाणी जामर होता मात्र आता चार ठिकाणी जामर बसवण्यात आले आहेत. या मोबाईल जामरची रेडियस क्षमता वाढवण्यात आल्यामुळे त्याचा फटका हिंडलगासह परिसराच्या 4-5 कि.मी. परिघातील गावांना बसत आहे. ग्रामपंचायतच्या दैनंदिन कामकाज आणि ग्रामपंचायत व्याप्तीतील बँका आणि इतर सरकारी कार्यालयातील कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्याचा त्रास गावासह परिसरातील नागरिकांना होत आहे. नागरिकांना गुगल पे, फोन पे करण्यात अडचणी येऊ लागली आहे. याखेरीज नेटवर्क मिळत नसल्याने त्याचा फटका ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांना सध्याच्या परीक्षेच्या काळात बसत आहे. यासाठी लवकरात लवकर जामरची समस्या दूर करावी. जामरचे रेडियस अर्थात व्याप्ती कारागृहापुरती मर्यादित ठेवून सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी हिंडलगा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गेल्या 17 फेब्रुवारी रोजी कारागृह पोलीस अधीक्षक कृष्णमूर्ती यांच्याकडे केली होती. तसेच रास्ता रोकोचा इशाराही दिला होता. तेंव्हा पोलीस अधीक्षकांनी दोन-चार दिवसात समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले होते.

यासंदर्भात ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र आता फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी जामरच्या समस्येचे निवारण करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन आज मंगळवारी सकाळी कारागृहासमोरच रास्ता रोको आंदोलन छेडले.

हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्षा मीनाक्षी परशराम हित्तलमनी यांच्या नेतृत्वाखालील या रास्ता रोको आंदोलनामध्ये ग्रा.पं. उपाध्यक्षा चेतना सुरेश अगसगेकर, सदस्य भाग्यश्री कोकितकर, बबीता कोकितकर, यल्लाप्पा काकतकर, डी. बी. पाटील, नागेश मन्नोळकर, रामचंद्र कुद्रेमनीकर, रामचंद्र मन्नोळकर, आरती कडोलकर, प्रसाद पेडणेकर, राहुल उरणकर, लक्ष्मी परमेकर, प्रेरणा मिरजकर, अलका कित्तूर, परशराम कुडचीकर, अशोक कांबळे आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य श्रीराम सेनेसह विविध संघटना आणि गावकऱ्यांचा सहभाग होता.

निवेदन स्वीकारल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, कारागृहातील मोबाईल जामरची सुधारणा करण्यात आले आहे. पूर्वी टू जी असणाऱ्या जामरची क्षमता फोर जी, फाईव्ह जी करण्यात येणार आहे. सध्या प्राथमिक स्तरावर त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे त्याचा त्रास सर्वसामान्यांना होत असून त्या संदर्भात मला निवेदनही देण्यात आले आहे. अंतिम निर्णयासाठी मी ते माझ्या वरिष्ठांकडे धाडले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कंग्राळी खुर्द शाळेत आर्थिक गैरव्यवहार!

Spread the love  एसडीएमसीची जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार; आंदोलनाचा इशारा बेळगाव : कंग्राळी खुर्द प्राथमिक मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *