केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
बेळगाव : बेळगाव शहरा सभोवतालच्या रिंगरोडची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. सदर रिंग रोड कामाबरोबरच बेळगाव जिल्ह्यातील 12 राज्य महामार्ग कामांना आपण मंजुरी देत आहोत. लवकरच या नव्या रस्ते कामांना प्रारंभ होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी आज सोमवारी बेळगावात केली आहे.
मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बेळगाव जिल्ह्यातील 3972 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या 238 किलोमीटर लांबीच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, बेळगाव शहरा सभोवतालचा रिंगरोड निश्चितच मार्गी लागेल.काकती जवळील उड्डाण पुलाला झालेला विरोध अडचणीचा आहे. अडचण दूर होताच उड्डाण पूल बांधला जाईल. भारतमाला 2 योजनेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील खानापूर, पाच्यापुर, रायबाग, चिंचली, जांबोटी, चिखलगुड, मंगसुळीसह एकूण 12 राज्य महामार्गांच्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात येईल.
खानापूर ते गोवा महामार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. नजीकच्या काळात लवकरच या रस्त्याचा उद्घाटन सोहळा पार पडेल. पाच नव्या रस्ते प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांमुळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आदी तीन राज्यातील दळणवळणाचे साधन सोयीचे होणार आहे. अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे जोडण्यात येणार आहेत. आपल्या मंत्रालयाकडे निधीची कमतरता नाही त्यामुळे हाती घेण्यात येणारी कामे निश्चितच पूर्ण केले जातात असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी राज्याबरोबरच देशात हाती घेण्यात आलेल्या विविध महत्त्वाच्या रस्ते प्रकल्प कामांची माहितीही यावेळी दिली.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, व अन्य मान्यवर उपस्थित आहेत.