बेळगाव : खडे बाजार येथील मंदिराच्या आवारात रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि मास मटणाचे तुकडे टाकले जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला जात आहे.
बेळगाव खडे बाजारमधील थळ देव मंदिरासमोर घाण कचरा टाकला जात आहे. येथे पडणार कचरा पाहिल्यास काहीनी या परिसराला कचरा कुंडीचे रूपच देण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसते. कचरा टाकण्याच्या या निंदनीय प्रकाराबद्दल स्थानिक नागरिकातून संताप व्यक्त होत असून नागरिकांनी या बाबीचा निषेध व्यक्त केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या सांगण्यावरून महापालिका स्वच्छता विभागाने या परिसराची अनेकदा स्वच्छता केली आहे. अविचारी लोकांनी या भागात पुन्हा कचरा, रिकाम्या दारूच्या बाटल्या किंवा मास मटणाचे तुकडे टाकू नये याची दक्षता घेण्यात आली. यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. येथे कचरा टाकू नका असे आवाहन करणारे फलक लावण्यात आले. तरीही काही अविचारी लोक इथे कचरा टाकत आहेत. महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्वच्छता विभागाचे कर्मचारी याकडे विशेष लक्ष देत नसल्याचा आरोप प्रवीण कणेरी यांनी केला आहे. बेळगावातील खडेबाजार येथील हे मंदिर हे भगवान शिवाचे निवासस्थान आहे. तथापि, काही लोकांनी इथे कचरा कुंडीचे स्वरूप आणले आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी दररोज स्वच्छता करतात. मात्र, लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने पुन्हा मंदिरासमोर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होत आहे. हा प्रकार थांबावा यासाठी, अनेक लोकांना दंड ठोठावून कारवाई करण्यात आली आहे. येथे कचरा टाकण्यास रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta