बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सावगाव येथील शिवारात होत असलेल्या अनैतिक कृत्यांना थांबवण्यासाठी गेलेल्या चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या युवकांची त्वरित सुटका करावी आणि सावगाव शिवारात अनैतिक कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करीत सावगाव ग्रामस्थानी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
सावगाव येथील शेतवडीत चाललेला गैरप्रकार थांबविण्यासाठी अनगोळ येथील रहिवासी सुदेश पाटील, संतोष जाधव तसेच जय इंजल आणि सुमित मोरे हे गेले असता त्यांच्यावरच बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकात एफआरआय दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. शिवारात चाललेला गैरप्रकार थांबविण्यास गेलेल्यांवर गुन्हा दाखल करणे चुकीचे असून तात्काळ या चौघांची सुटका करावी आणि शिवारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करीत सावगाव ग्रामस्थानी आंदोलन छेडले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सावगाव गावातील शिवारात नेहमीच गैरप्रकार चालतात. या परिसरात प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे यामुळे या परिसरातून जाताना गावातील महिलांना मान खाली घालून जावे लागते. मद्य प्राशन करण्यासाठी काही टोळकी येथे येऊन रिकाम्या दारूच्या बाटल्या शिवारात आणि नजीकच्या जलाशयात टाकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होतो. व्यसनाधीन लोक येथे बसून अर्वाच्च भाषेत बोलत असतात. यामुळे चांगल्या लोकांना या भागातून जाणे कठीण झाले आहे. महिला शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण होत आहे. पोलीस प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून सावगाव शिवारात चाललेल्या गैरप्रकारांवर आळा घालावा असे ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लप्पा पाटील यांनी म्हटले आहे.
गावातील शिवारात दारू पिणे यासह अन्य गैरप्रकार चालत आहेत. ते रोखण्यासाठी गेलेल्यांवरच कारवाई करणे चुकीचे आहे. शिवारात चाललेल्या गैरप्रकारांमुळे महिला शेतकऱ्यांना शेतात कामाला जाणे कठीण झाले आहे . असे गैरप्रकार थांबवावेत तसेच गावातील तरुणांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेऊन त्यांची सुटका करावी अशी मागणी अन्य एका ग्रामस्थांनी केली आहे. या आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.