बेळगाव : इंद्रप्रस्थ नगर येथील एका अपार्टमेंट परिसरात सकाळी ५:३० वाजता भटक्या कुत्र्यांनी दोन सिक्युरिटी गार्ड्सवर हल्ला केला. कुत्र्यांच्या हल्ल्यात नारायण पार्सेकर रा. आनंदनगर वडगाव, तसेच तुरब देसाई रा. आंबेडकर नगर, अनगोळ येथील दोघांच्या पायांवर चावल्याने जखमेतून रक्तस्त्राव होऊन ते बेशुद्ध अवस्थेत पडले. घटनेनंतर जखमींना बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे.
इंद्रप्रस्थ नगरचे नागरिक या घटनेमुळे भयभीत झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वर्षानुवर्षे चालूच आहे. अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी इंद्रप्रस्थ नगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.