बेळगाव : संपत्तीच्या वादातून वारंवार होत असलेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन पुतण्याने स्वतःच्या काकाचा जांबीयाने भोसकून खून केल्याची घटना शहरातील पाटील मळ्यात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ माजली आहे. अनिल शरद धामणेकर (वय 46) रा. पाटील मळा बेळगाव असे ठार झालेल्या मयताचे नाव आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, पुतण्या आदित्य दीपक धामणेकर आणि काका अनिल शरद धामणेकर यांच्यात संपत्तीवरून काही दिवसापासून वाद सुरू होता. बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास आदित्य दीपक धामणेकर पुतण्या आणि अनिल धामणेकर (काका) यांच्यात बाचाबाची झाली त्याचे पर्यवसान हाणामारीत होऊन आदित्यने अनिल यांच्या पोटात जांबीयाने सपासप वार केले. या हल्ल्यात अनिल गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत अनिल यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र अति रक्तस्त्राव आणि पोटावर झालेल्या वारामुळे रात्री साडेबाराच्या दरम्यान अनिल यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
रात्री साडेदहा वाजता पोलीस उपायुक्त रोहन जगदीश आणि खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला.
गेल्या पंधरा दिवसातील बेळगाव शहरातील हे दुसरे खून प्रकरण आहे. या घटनेने पाटील मळा परिसरात एकच खळबळ माजली होती.
अनिल धामणेकर हे पाटील मळा भागातील एक सामाजिक कार्यात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व होते. काल रात्री ही घटना समजताच अनिल यांच्याशी संबंधित जिल्हा रुग्णालयाबाहेर मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले याचा परिवार आहे. गुरुवारी दुपारी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

Less than 1 min.