
बेळगाव : आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांना रुग्णालयातून सोडून पलायन केल्याची घटना बेळगावात घडली आहे. उपाचाराविना दुर्दैवी वडिलांचा मृत्यू झाला.
आजारी असलेल्या सतीश्वर नामक व्यक्तीला काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाने उपचारासाठी बिम्स रुग्णालयात दाखल केले होते. दहा दिवसांपूर्वी वडिलांना रुग्णालयातच सोडून तो अचानक पळून गेला. मुलगा येईल या आशेने जीव मुठीत धरून उपचार घेत असलेल्या सतीश्वर यांनी काल उपचार अयशस्वी झाल्याने अखेरचा श्वास घेतला. मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आला असला तरी मुलगा किंवा त्याच्या कुटुंबीयांचा पत्ता नाही.
या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच रुग्णालय गाठून मृत सतीश्वरच्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तो काम करत असलेल्या काही ठिकाणी चौकशी केली, मात्र तो सापडला नाही. नंतर समजले की त्यांची मुलगी गोव्यात राहते. त्यांच्या मुलीला संपर्क करून गोव्यातून बोलावून त्यांच्यावर बेळगावातील सदाशिवनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta