खानापूर : खानापूर – एम. के. हुबळी मार्गावरील गाडीकोप रस्त्याला लागून असलेल्या शेतवडीत खानापूर तालुक्यातील बलोगा येथील शिवनगौडा इरनगौडा पाटील (वय 48) यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना काल दिनांक 1 एप्रिल रोजी घडली आहे. मयत शिवनगौडा याचा भाऊ सन्नगौडा पाटील यांनी याबाबत खानापूर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. दास्तीकोप येथे शिवनगौडा यांची मेहुणी राहते दास्तीकोप गावची लक्ष्मी यात्रा सुरू असल्यामुळे शिवनगौडा आपल्या पत्नी मुलांसमवेत यात्रेसाठी गेले होते. काल रात्री त्याने आपल्या पत्नी व मेहुणीला आपल्या गावी बलोगा येथे जाऊन येतो असे सांगून तो रात्री घराबाहेर पडला होता. मात्र तो बलोग्याला पोहोचलाच नाही. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह गाडीकोप गावच्या इराप्पा जोळद यांच्या शेतवडीत आढळला. मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी शिवनगौडा यांची तीक्ष्ण दगडाने ठेचून हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांच्या डोक्यावर व डाव्या बाजूच्या कानावर दगडाने ठेचल्याचे व्रण दिसून आले आहेत. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलिसांनी मृतदेह खानापूर येथील सरकारी दवाखान्यात उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. खानापूर पोलीस स्थानकाचे पीआय एल. एच. गवंडी व पीएसआय एम. बी. बिरादार अधिक तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta