बेळगाव : महागाईसह अन्य समस्यांवरून राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत बेळगाव भाजपच्या उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण मंडळतर्फे शनिवारी काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. राणी चन्नम्मा चौकात भाजपचे विविध मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन सरकारविरोधात घोषणा देत निषेध फलक दाखवले.
यावेळी बोलताना महापालिकेच्या भाजप अध्यक्ष गीता सुतार म्हणाल्या, काँग्रेस सरकारने प्रत्येक वस्तूची किंमत वाढवली आहे. मुस्लीम समाजासाठी बजेटमध्ये ४ टक्के निधी राखून ठेवत इतर अल्पसंख्याक समाजाकडे दुर्लक्ष केले. हे सरकार संविधानाचा अपमान करणारे असून, जनविरोधी आहे. गॅरंटीच्या नावाखाली आत्महत्येची गॅरंटी दिली आहे. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून आम्ही मंडळ, तालुका आणि जिल्हास्तरावर सतत आंदोलने करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
नेते रमेश देशपांडे म्हणाले, मंत्र्यांवर हनीट्रॅप घडत आहे, त्यांच्या मुलांच्या खूनाचा प्रयत्न होत आहे, त्यांनाच संरक्षण मिळत नसेल तर सामान्य जनतेची जबाबदारी कोण घेणार? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे, असा आरोप त्यांनी केला.
निषेध रॅलीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचून भाजपाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनात भाजपचे नेते ईरय्या, मल्लिकार्जुन, गणेश देसाई, राजकुंवर पावले, विजय कोडगणूर, युवराज जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.