बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यासाठी माजी आमदार कै संभाजी पाटील व मराठी भाषिकांनी परिश्रम घेतले असून पुतळा उभारणीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत याचा संपूर्ण शिवप्रेमीना अभिमान आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केले आहे.
राम नवमीचे औचित्त साधून साहेब फाउंडेशन आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांतर्फे रविवारी धर्मवीर संभाजी चौक येथे मिठाईचे वाटप करण्यात आले. प्रारंभी शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर, सीमाभाग युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, साहेब फाउंडेशनचे सतीश कूगजी व माजी उपमहापौर संजय शिंदे यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिरोळकर यांनी या चौकाचा संभाजी महाराज चौक असा उल्लेख करावा अशी सातत्याने सूचना करून देखील बोगारवेस असाच उल्लेख केला जात होता. त्यामुळे समिती नेते व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेत या चौकात धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा उभा केला. तेव्हापासून धर्मवीर संभाजी चौक म्हणून चौकाला महत्त्व प्राप्त झाले आहे असे मत व्यक्त केले.
शुभम शेळके यांनी सर्वांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या इतिहासापासून प्रेरणा घेत पुढे गेले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी धनंजय पाटील, मोतेश बारदेशकर, नारायण मुचंडीकर, प्रवीण रेडेकर, इंद्रजित धामणेकर, रमेश माळवी, बाळासाहेब मासणकर, पिंटू बेळगावकर, राजू कणेरी, सुरज पेडणेकर, तेजस्वी देसाई आदी उपस्थित होते.