बेळगाव : “बातम्या समाजाची शांतता बिघडवू नयेत, तर आरोग्यपूर्ण समाज घडवणाऱ्या असाव्यात, माध्यम हा समाजाचा चौथा स्तंभ म्हणून गौरवोद्गार करत प्रसार माध्यमामुळे बेळगावातील घडामोडी दिल्लीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे माध्यमांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे.” असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.
बेळगावात जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या उद्घाटन समारंभात उदघाटक म्हणून उपस्थिती असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी उपरोक्त विचार मांडले. माध्यमांवर समाजातील शांतता आणि आरोग्य जपण्याची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.“बातम्यांनी समाजात वाद निर्माण होऊ नये, जात, भाषा, धर्म यावर आधारित भांडणे होऊ नयेत. बेळगाव जिल्ह्याचे नाव खराब होईल अशा गोष्टींना माध्यमांनी थारा देऊ नये,” असे त्यांनी स्पष्ट केले. हा उद्घाटन समारंभ बेळगावातील शिवबसव नगरमधील एसजीबीआयटी कॉलेजच्या सभागृहात जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मंजुनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मंत्री सतीश जारकीहोळी, खासदार जगदीश शेट्टर, आमदार असीफ सेठ, महांतेश कौजलगी, बाबासाहेब पाटील, आमदार चन्नराज हट्टीहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यान्ग, पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, महापालिका आयुक्ता बी. शुभा यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
खासदार जगदीश शेट्टर यांनी, “लोकशाहीमध्ये शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि माध्यम हे चार स्तंभ नीट काम करत असतील तरच लोकशाही नीट चालते, असे सांगत बेळगाव सारख्या सीमाभागात मराठी-कन्नड स्नेह जपण्याचे काम माध्यमांनी करायला हवे.” असे म्हटले. तसेच, पत्रकारांसाठी भूखंड वाटप आणि अनुदानासाठी राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले की, “सीमाभागातील संवेदनशील बातम्या परिणाम लक्षात घेऊन लोकांसमोर आणाव्यात, समाजाच्या तळागाळातील घटकाला प्रसारमाध्यमानी न्याय मिळवून द्यायला हवेत.”आमदार असीफ सेठ यांनी, पारदर्शकता ठेवून संपूर्ण देशासाठी योग्य माहिती पोहोचवण्याचे आवाहन पत्रकारांना केले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी माध्यमांमध्ये “सत्याचा प्रकाश पसरवण्याची शक्ती” असल्याचे सांगितले. “माध्यम हे सरकार आणि लोकांमधील दुवा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी माध्यमांना “फक्त सत्य बातम्या प्रसारित कराव्यात, गैरसमज आणि भीती पसरवणाऱ्या बातम्या टाळाव्यात” असे सांगितले. “स्वतःची मते प्रसारित करून समाजात विष पेरण्याचे काम माध्यमांनी करू नये,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात बेळगाव मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष कृष्णा शहापुरकर, श्रीकांत कुबकड्डी, मेहबूब मकानदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.