
बेळगाव : शहरातील क्लब रोडवरील वनिता विद्यालय या शाळेत विद्यार्थ्यांची वार्षिक फी कोणतीही पूर्वसूचना न देता वाढवल्यामुळे शाळा प्रशासनावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळेच्या वार्षिक निकालाच्या दिवशी सदर ही वाढीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे शाळेत पालकांचा एकच गोंधळ उडाला.
अचानकपणे केलेल्या फी वाढच्या घोषणेमुळे पालक संतप्त झाले. शाळा व्यवस्थापनाने कोणतीही पूर्व सूचना न देता ही वाढ जाहीर केली त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली तर काही पालकांनी थेट मुख्याध्यापिका जोशीफिन गुंती यांच्याशी संपर्क साधला व फी वाढी संदर्भात चर्चा केली त्यामुळे शाळेच्या कार्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अनेक पालकांनी आपल्या समस्या मांडल्या आणि स्पष्टीकरणाची मागणी केली. काही वेळासाठी शाळेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. शाळा प्रशासनाला जर फी वाढवायचीच होती तर किमान आधी पालकांना तशी पूर्वसूचना देणं आवश्यक होतं.
फी वाढीसंदर्भात मुख्याध्यापिका म्हणाल्या की, शाळेची फी रचना शाळा व्यवस्थापन ठरवते. मागील पाच वर्षांमध्ये कोणतीही फी वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे यंदा ही वाढ करण्यात आली आहे. आम्ही पालकांच्या भावना व्यवस्थापनापर्यंत पोहोचू व पुढील दहा दिवसात या समस्येवर योग्य तो तोडगा काढू.
आता पालक व्यवस्थापनाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. अचानकपणे वाढवलेल्या फी वाढी संदर्भात शाळा व्यवस्थापन कोणता निर्णय घेते याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta