बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर वाढत्या महागाईबाबत भाजपने पुन्हा एकदा तोफ डागली आहे. सरकारच्या निष्क्रिय धोरणांमुळे राज्यात सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचा आरोप करत, भाजपकडून १६ एप्रिल रोजी बेळगावात जनआक्रोश यात्रा आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस पी. राजीव यांनी दिली.
बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील सर्वसामान्य जनतेवर वाढत्या महागाईचा भार टाकणाऱ्या काँग्रेस सरकारचा निषेध करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत असल्याचे पी. राजीव यांनी सांगितले. भाजप ही यात्रा जनतेच्या वतीने काढत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर आर्थिक अकार्यक्षमतेचा आरोप करत पी राजीव म्हणाले, देशात सर्वाधिक महागाईचा दर कर्नाटकात असून, राज्य सरकार करसंकलनाचे उद्दिष्टही गाठू शकलेले नाही. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात कर वाढवूनसुद्धा सरकार अपयशी ठरल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, पाण्यापासून ते ४८ आवश्यक वस्तूंपर्यंत दरवाढ झाली आहे, मात्र राज्याचा विकास मात्र पूर्णतः शून्य राहिला आहे.शक्ती योजनेअंतर्गत महिलांसाठी मोफत बससेवा सुरू करून सरकारने तब्बल ७ हजार कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा दावा करत त्यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली. तसेच, केपीटीसीएलची मालमत्ता २० हजार कोटी रुपयांना विक्रीस काढल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. बेळगावातील एका प्रभावशाली मंत्र्याने कथितपणे जमिनी हडपल्याचे प्रकरण उघडकीस आणण्यासंबंधी विचारण्यात आले असता, पी. राजीव यांनी यापैकी ३० टक्के पुरावे गोळा झाल्याचे सांगितले. उर्वरित नोंदी मिळाल्यावर या कागदपत्रांची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील, महांतेश कवटगिमठ, नगरसेवक हनुमंत कोंगाळी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.