बेळगाव : बेळगाव येथील शिवजयंतीला 105 वर्षाची परंपरा लाभली आहे. बेळगावात शिवजयंती उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरात शिवजयंती उत्सव 29 एप्रिल रोजी तर 1 मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवजयंती उत्सव काळात प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे पोलीस आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी यासाठी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे खजिनदार प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी यांनी पोलिस आयुक्तालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडे निवेदन दिले. त्याचप्रमाणे शिवजयंती उत्सवासंदर्भात आवश्यक ती माहिती देखील पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. शहरातील नरगुंदकर भावे चौक येथे मंगळवार दिनांक 29 रोजी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून नरगुंदकर भावे चौक येथून पालखी पूजनाने मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. सदर मिरवणूक मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, रामलिंग खिंड, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर मार्गे कपिलेश्वर मंदिर येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta