हजारो भाविकांची उपस्थिती; चोख पोलीस बंदोबस्त
येळ्ळूर : येळ्ळूरची ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवी, श्री कलमेश्वर व श्री महालक्ष्मी देवी वाढदिवसानिमित्त संयुक्त अशा यात्रोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली असून, सोमवारी सायंकाळी आंबिल गाड्यांची भव्य अशी मिरवणूक पारंपारिक वाद्यांच्या गजरात गावामध्ये काढण्यात आली. गाड्यांना सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले होते. याचबरोबर बैल जोड्यांनाही सजवून मिरवणुकीत सहभागी करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करीत आंबिल गाड्यांची भव्य अशी मिरवणूक गावांमध्ये काढण्यात आली. हर हर महादेव व श्री चांगळेश्वरी माता की जय, असा जयघोष सर्वत्र दुमदुमत होता. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी बैल जोड्यांना सजवून गावामध्ये पारंपरिक वाद्यासह मदल मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास प्रथम श्री कलमेश्वर मंदिरासमोर इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सायंकाळी सात वाजता श्री चांगळेश्वरी मंदिरासमोर हजारो भाविकांच्या उपस्थितीत हर हर महादेव, तसेच श्री चांगळेश्वरी माता की जय, च्या जयघोशात मोठ्या उत्साहात इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी चांगळेश्वरी देवीच्या पुजाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने इंगळ्यांचे पूजन केले, विविध मानकऱ्यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा पार पडल्यानंतर, भाविक मोठ्या उत्साहात इंगळ्या मधून पळत होते. इंगळ्या मधून पळण्यासाठी भाविक व महिला तसेच लहान मुले दिवसभर निरंकार उपवास करतात. इंगळ्या कार्यक्रमाच्या वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज बुधवार (ता. 23) रोजी श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे, तर गुरुवार (ता. 24) रोजी महाराष्ट्र मैदानात जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta