
बेळगाव : बेळगावातील गणपत गल्ली परिसरातील अतिक्रमण हटविल्याने अखेर या बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला आहे. बेळगाव महानगरपालिका आणि वाहतूक विभाग पोलिसांनी संयुक्तरित्या राबविलेल्या कारवाईत फेरीवाल्यांना हटवण्यात आले असून, त्यामुळे वाहतूक कोंडीपासून नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गणपत गल्लीसह शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये फेरीवाले आणि बैठे विक्रेते रस्त्यावरच ठिय्या देऊन व्यवसाय करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. विशेषतः गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, रविवार पेठ, रामदेव गल्ली आणि समादेवी गल्ली या ठिकाणी यामुळे सतत कोंडीची स्थिती निर्माण होत होती. एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावरही वाहनांची दोन्ही बाजूंनी ये-जा सुरू होती. पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्यामुळे वाहनचालक बेधडकपणे कुठेही गाड्या उभ्या करत होते. यामुळे वाहतूक पोलिसांवर नाराजी व्यक्त केली जात होती, कारण ते केवळ दंड वसूल करण्यावरच लक्ष केंद्रित करत असल्याचे जनतेचे म्हणणे होते. शहरातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर अखेर महापालिका आणि वाहतूक विभागाने संयुक्तरित्या कंबर कसली. दुकानदारांनी दुकानदाराच्या हद्दीबाहेर ठेवलेले साहित्य जप्त करत भाजीपाला, फळे, फुले विकणाऱ्या फेरीवाल्यांना हटविण्यात आले. फेरीवाल्यांना हटविल्यामुळे मुख्य बाजारपेठ असलेली गणपत गल्ली मोकळी झाली आहे.
महापालिकेने पार्किंगसाठी नवी जागा उपलब्ध करून देण्याबाबत उदासीनता दाखवल्याने ही समस्या अधिक तीव्र झाली होती. मात्र अतिक्रमण हटविल्यामुळे बाजारपेठेतील वाहतुकीला सुसूत्रता येऊ लागली आहे. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या कारवाईचे स्वागत केले असून, ही मोहीम काही दिवसांतच थांबवू नये, तर सातत्य ठेवावे, अशी मागणी केली आहे. महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने आता या कृतीला शिस्तबद्ध नियोजनात बदलवण्याची आणि भविष्यात फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याची गरज व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta