बेळगाव : बेळगाव-धारवाड थेट रेल्वे मार्ग प्रकल्पातील ६०० एकर जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून रेल्वे विभागाचे अधिकारी एका महिन्यात निविदा मागवतील, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
बेळगाव-धारवार नवीन रेल्वे मार्ग माजी केंद्रीय मंत्री डी. सुरेश अंगडी यांचा हा स्वप्नातील प्रकल्प होता, बेळगाव जिल्ह्यातील ६०० एकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. बेळगाव ते धारवाड मार्गे कित्तूरपर्यंतचे अंतर ७५ कि.मी. असेल. धारवाडला तीन तासांऐवजी फक्त दीड तासात पोहोचू शकणार. या रेल्वे प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर, बेळगाव-धारवाड आणि हुबळी यांना तिहेरी शहर म्हणून विकसित करण्यास हातभार लागेल.
२०२० मध्ये सुरेश अंगडी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असताना या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला. केंद्र सरकारने यासाठी ९०० कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे नंतर हा प्रकल्प मागे पडला. ते पुढे म्हणाले की, खासदार जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एक वर्षापासून सतत बैठका घेतल्या जात आहेत आणि आता बेळगाव जिल्ह्यातील ६०० एकर जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
बेळगाव-धारवाड थेट रेल्वे मार्ग प्रकल्प गेल्या ४ वर्षांपासून रखडला होता. आम्ही पाच महिन्यांपासून जमीन संपादन प्रक्रिया जलद केली आहे. जमीन संपादन दोन टप्प्यात होईल, पहिल्या टप्प्यात ६०० एकर आणि दुसऱ्या टप्प्यात आणखी ६०० एकर जमीन संपादित केली जाईल. एकूण १२०० एकर जमीन संपादन पूर्ण झाली आहे, जेणेकरून बेळगाव-बेंगळुरूला लोंढाऐवजी थेट धारवाड मार्गे पोहोचता येईल. त्याचप्रमाणे वंदे भारत ट्रेन देखील खूप लवकर पोहोचेल. रेल्वे विभाग पुढील महिन्यात निविदा मागवेल. त्यासाठी लागणारे पैसे आम्ही वाटून देऊ. अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि सरकारने आधीच संपादित केलेली ७०० एकर जमीन स्वीकारली आहे. उर्वरित जमिनीसाठी आम्ही प्रस्ताव सादर केला आहे. पुढील महिन्यात हे देखील शक्य होईल असे त्यांनी स्पष्ट केले. ७५ किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग २ वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा रेल्वे मार्ग बेळगाव, देसुर, एम.के. हुबळी, कित्तूर आणि तेगुरूहून धारवाडला मिळेल.
Belgaum Varta Belgaum Varta