
बेळगाव : आता बेळगावकरांसाठी देखील नवीन ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे, अशी घोषणा बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली.
बंगळूरु-धारवाड दरम्यान सध्या सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस सेवा बेळगाव शहरापर्यंत वाढवण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्यासोबत अनेक बैठका आणि चर्चा झाल्या. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी हे देखील या बैठकांमध्ये उपस्थित होते आणि त्यांनीही या मागणीसाठी पाठपुरावा केला, हे येथे उल्लेखनीय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव-बंगळूरु दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असून, ती सकाळी बेळगावातून निघून बंगळूरुला पोहोचेल आणि त्यानंतर दुपारी बंगळूरुहून परत निघून रात्री बेळगावात पोहोचेल. बेळगावातून नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी दिल्याबद्दल खासदार जगदीश शेट्टर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्यासाठी तारीख निश्चित करून बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta