बेळगांव : हिंदू धर्म संस्कृतीचे संरक्षण होण्यासाठी आपल्या मुलांवर उत्तम संस्कार होणे आवश्यक आहेत. मुलांची तेजस्विता वाढविण्यासाठी व वैदिक संस्कारांचा वारसा घरोघरी सुरू ठेवणे काळाची गरज असून सर्वांनी हिंदू म्हणून एकत्रित झाले पाहिजे. भविष्यात समस्त हिंदूधर्मियांनी मोठ्यासंख्येने आपल्या पाल्यांवर उपनयन संस्कार करून देश बलवान करण्यासाठी समर्पित व्हावे. कारण धर्म सुरक्षित तर देश सुरक्षित असेल. त्यामुळे संस्कारांचा वारसा भावीपिढी पर्यंत पोहचवूया, असे आवाहनपर प्रतिपादन श्री दत्त पद्मनाभ पीठ, संचालक सुजन नाईक यांनी केले.
श्री दत्त पद्मनाभ पीठ तथा स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, श्री क्षेत्र तपोभूमी – गोवा यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित, अध्यात्म शिरोमणि सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य कृपाशीर्वादाने श्री चांगळेश्वर मंदिर, येळ्ळूर – बेळगांव – कर्नाटक येथे दि. १४ मे रोजी गुरुपीठाच्या वैदिक शिष्यांच्या पौरोहित्याखाली सामुहिक उपनयन संस्कार समारंभ उत्साहात सुसंपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित ॐ दत्त ब्रह्माश्रम, झाडनावगा – खानापूर येथे वेदपाठशाळेत उपनीत बटु धर्मशिक्षण प्राप्त करणार आहेत.
धरोघरी हिंदू संस्कारांचे जतन व्हायचे असेल तर नारीशक्तीने धर्म कार्यात पुढाकार घेणे आवश्यक आहे. मुलांना सुसंस्कारांनी मंडित करणे ही प्रत्येक आईची जबाबदारी आहे. कारण बालपणीच सुसंस्कारांचे बीजारोपण करता येते. आपली मुलं संस्कारीत असतील तर आपला धर्म सुरक्षित असेल. त्यामुळे आपल्या घरात हिंदूत्व जपण्यासाठी प्रत्येक आईने उपनयना सारखे हे दिव्य संस्कार आपल्या पाल्यांवर करण्यासाठीचा संकल्प करावा. असे आवाहन श्री दत्त पद्मनाभ पीठ – ब्रह्मवादिनी संघटनेच्या प्रतिनिधी नम्रता परुळेकर यांनी केले.
तपोभूमी गुरुपीठाचे दिव्य महान कार्य येळ्ळूर गावात संपन्न होत आहे हे ग्रामस्थांचे भाग्य होय. हिंदू धर्मातील हा दिव्य उपनयन संस्कार या ही पुढे या गावात आयोजित व्हावा. यासाठी आम्ही सहकार्य करू. आपल्या धर्मातील संस्कार व संस्कृती जपणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मनिषा घाडी यांनी केले.
आपल्या घराचा समृद्ध वारसा ज्या पीढीकडे देऊ पाहतो त्या पिढीला संस्कारांनी मंडीत करण्याचा या पंचक्रोशीतील जनतेला एक अलौकिक योग यानिमित्त प्राप्त झाला आहे. असे कृतार्थतेने पालकांनी समाधान व्यक्त केले.
हरिश दत्तु चौगुले, श्रेयस नामदेव गुरव, साईप्रसाद सुनील कामती, शिवप्रसाद उमेश काकतकर, राजवीर प्रभाकर पाटील, सुयेश महेश जाधव, गणेश संजय पाटील, आरव विद्याधर पाटील, पांडुरंग मोहन पाटील, साईसिंग हरिसिंग विष्ट, वरदराज महेश नाथबुवा या भाग्यवंत बालकांचा उपनयन संस्कार संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर सुजन नाईक – संचालक – श्री दत्त पद्मनाभ पीठ, दिनेश भंडारी – सहकोषाध्यक्ष – संत समाज संघटना, सोमनाथ पाटील – संत समाज संघटना – बेळगांव जिल्हा कार्याध्यक्ष, नम्रता परुळेकर – श्री दत्त पद्मनाभ पीठ – ब्रह्मवादिनी संघटनेच्या प्रतिनिधी, रश्मी नाईक – अध्यक्षा – जगत् जननी, दिव्या भंडारी – कोषाध्यक्ष – जगत् जननी, लक्ष्मी मालेकर – अध्यक्षा येळ्ळूर ग्रामपंचायत, रुपा धामणेकर – अध्यक्षा एस्. डी. एम्. सी. सरकारी मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर , मनिषा घाडी, परशुराम पाटील, यल्लपा पाटील – देवस्थान पदाधिकारी, राजू उघाडे – समाज सेवक, रुपा पुण्यान्नावर व सुवर्णा बिजगरकर – ग्रामपंचायत सदस्या आदि. मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta