पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांची माहिती
बेळगाव : कर्नल सोफिया कुरेशी यांच्या घरावर आरएसएस आणि हिंदू संघटनांनी हल्ला करून तोडफोड केली, अशी खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवणाऱ्या अनिस उद्दीन नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले की, अनिस उद्दीन याने एका जुन्या फोटोचा वापर करून सोशल मीडियावर चुकीची पोस्ट टाकली होती. बेळगाव पोलिसांनी तात्काळ या पोस्टची दखल घेत ती डिलीट करण्यास सांगितले. अनिस कॅनडामध्ये बसून ही पोस्ट करत असल्याने पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ३५३(२) आणि १९२ अंतर्गत स्वतःहून दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिस उद्दीनबद्दल ट्विटरच्या लीगल सेलकडे माहिती मागवण्यात आली आहे. तो नेमका कुठला आहे, याची माहिती लवकरच मिळेल. जर तो भारतात असेल, तर त्याला त्वरित अटक केली जाईल. जर त्याने कॅनडामधून हे कृत्य केले असेल, तर भारत सरकार कॅनडा सरकारशी बोलून राजनैतिक स्तरावर कारवाई करेल. त्याच्याविरुद्ध सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे, असेही डॉ. गुळेद यांनी सांगितले.