बेळगाव : बेळगावातील टिळकवाडी येथील सेंट्रल केअर हॉस्पिटलसमोर रेल्वे गेटजवळ फूटपाथवर बेघर आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीला फेसबुक फ्रेंड्स सर्कलने मदतीचा हात पुढे केला.
या व्यक्तीची दयनीय अवस्था पाहून फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी त्वरित टिळकवाडी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी आणि पोलीस कर्मचारी बी. बी. तिप्पनवर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरेश कांबळे आणि तिप्पनवर यांनी जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था केली. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अधिक काळजी व पुनर्वसनासाठी एका स्थानिक संस्थेकडे सोपवले. बेघर आणि मानसिकदृष्ट्या त्रस्त असलेल्या व्यक्तीला तातडीने मदत करणाऱ्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर आणि त्यांच्या टीमच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच, टिळकवाडी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दलही त्यांचे अभिनंदन केले जात आहे.