बेळगाव : अखिल लिंगायत नुरू कयक पंगड महासंघाच्या राज्य आणि बेळगाव जिल्हा युनिटचे शानदार उद्घाटन नुकतेच पार पडले. शहरातील कन्नड भवन येथे बुधवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात कारंजीमठाचे श्रीगुरुसिद्ध महास्वामीजी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते जगज्योती बसवेश्वरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष अरविंद परवशेेट्टी, संस्थापक राज्याध्यक्ष मल्लप्पा चौगुला, प्रधान सचिव केम्पण्णा यक्संबी, कोषाध्यक्ष प्रसाद हिरेमठ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शरण मुत्तेप्पा गोड्याल आणि शरणे महानंद परुशेट्टी यांनी षटस्थल ध्वजारोहण केले.
श्रीकांत शानवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. अरविंद परवशेेट्टी यांनी इष्टलिंगाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलेल्या य. रु. पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. शेवटी प्रेम चौगुला यांनी आभार मानले. या कार्यक्रमात बोलताना श्रीगुरुसिद्ध महास्वामीजी म्हणाले की, समाजात एकजूट होऊन मुख्य प्रवाहात येण्यासाठी हे संघटन अधिक मजबूत व्हावे. अखिल लिंगायत नुरू कायक पंगड महासंघाच्या माध्यमातून समाजातील विविध व्यावसायिक आणि कामगार एकत्र येतील आणि एक मजबूत शक्ती म्हणून उदयास येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन सोहळ्याला आर. पी. पाटील, सुजीत मुळगुंद, सतीश चौगुले, बसवराज रायव्वगोळ यांच्यासह शेकडो बसवभक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.