Wednesday , May 27 2026
Breaking News

मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या दुपारी राजीनामा देणार; चाहते संतप्त कर्नाटकच्या राजकारणात क्लायमॅक्स

Spread the love

 

बंगळूर : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकाच्या राजकारणात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा अधिकृत निर्णय घेतला असून, गुरुवारी दुपारी ते राज्यपालांकडे राजीनामा सादर करणार असल्याचे समजते.

राजभवनातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटीसाठी वेळ देण्यात आला असून, गुरुवारी दुपारी ३ वाजता ते लोकभवन येथे जाऊन राज्यपालांकडे आपले राजीनामा पत्र सुपूर्द करणार आहेत. त्यानंतर ते संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “सिद्धरामय्या यांनाच मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवावे” अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. काही समर्थकांनी राहुल गांधी यांच्या निर्णयावरही नाराजी व्यक्त केली. आंदोलन करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज्यात कोणताही गोंधळ होऊ नये, सर्व प्रक्रिया शांततेत पार पडावी, असा संदेश काँग्रेस हायकमांडकडून सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीयांना देण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाची शक्यता अधिक बळकट झाली असून, त्यांच्या जागी केपीसीसी अध्यक्षपदासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे नाव चर्चेत आले आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री जमीर अहमद खान आणि सतीश जारकीहोळी यांची झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

मुख्यमंत्र्यांचे राजीनाम्याचे संकेत
राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर काँग्रेस हायकमांडने अखेर पडदा टाकल्याची जोरदार चर्चा सुरू असून, मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वतः सिद्धरामय्या यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजीनाम्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

दिल्लीतील इंदिरा भवन येथे बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राहूल गांधी यांनी सिद्धरामय्या यांच्यासोबत सुमारे ४५ मिनिटे चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. सत्तावाटपाच्या सूत्रानुसार पदाचा राजीनामा देण्याबाबत त्यांना सूचित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, सिद्धरामय्या यांनी ‘एक्स’वर राज्य सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीचा उल्लेख करत भावनिक पोस्ट शेअर केली. “सरकारच्या सर्व यशाचे श्रेय राज्यातील जनतेलाच अर्पण करतो,” असे त्यांनी नमूद केले. निवडणुकीपूर्वी दिलेली प्रत्येक हमी पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला.

पाच हमी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याचे सांगताना त्यांनी ‘गृहज्योती’ योजनेचाही उल्लेख केला. या योजनेअंतर्गत राज्यातील १.६४ कोटी कुटुंबांना दरमहा २०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवली जात असून, यासाठी आतापर्यंत २६,११५ कोटी खर्च करण्यात आल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सिद्धरामय्या यांच्या या पोस्टकडे काही जण राजीनाम्याचा अप्रत्यक्ष संकेत म्हणून पाहत आहेत, तर काहींनी ती सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीचा आढावा मानला आहे.

निकटवर्ती मंत्र्यांचे शिष्टमंडळ कावेरी निवासस्थानी

दरम्यान, सिद्धरामय्या यांच्या जवळच्या मंत्र्यांचा एक गट मुख्यमंत्र्यांच्या कावेरी या शासकीय निवासस्थानी दाखल होत असून, तेथे चर्चा करत आहे. असे म्हटले जात आहे की, जवळचे मंत्री आणि आमदार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या संभाव्य राजीनाम्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण मागत आहेत.

मंत्री जमीर अहमद खान, एच.सी. महादेवप्पा, एम.सी. सुधाकर, संतोष लाड, एच.के. पाटील, एम.बी. पाटील, आर.बी. थिम्मापूर, के.जे. जॉर्ज, के. व्यंकटेश यांनी कावेरी निवासस्थानी येऊन चर्चा केली. शिवलिंगगौडा, राजेंद्र राजन्ना, मलूर नांजेगौडा, माजी मंत्री नागेंद्र, नझीर अहमद, राघवेंद्र हितनल, मागडी बालकृष्ण यांनीही भेट देऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा केली.

सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर निकटवर्तीयांनी चिंता व्यक्त केली आहे. काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी त्यांना राजीनामा न देण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगले असल्याचे म्हटले जात आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबतच्या भेटीनंतर बोलताना एच. के. पाटील म्हणाले, “ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली आहे. आम्ही आमच्या चिंता व्यक्त केल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री सिद्धरामय्या गप्प राहिले. आम्ही आज मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो आहोत. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातमीच्या पार्श्वभूमीवर आम्ही भेटलो. साहजिकच, आम्हालाही काही चिंता होत्या. त्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. आम्ही मुख्यमंत्र्यांना आमच्या चिंता आणि आमची विनंती सांगितली. मात्र, मुख्यमंत्री गप्प राहिले आणि म्हणाले की ते काही बोलणार नाहीत.”

About Belgaum Varta

Check Also

उद्या सकाळी ११ वाजताचा मुहूर्त ठरला; सर्व गोंधळ संपेल : मंत्री सतीश जारकीहोळी

Spread the love  बेंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेसमधील नेतृत्व बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *