Monday , September 21 2026
Breaking News

बैलूर क्रॉसजवळ दरोडा; 30 लाखांचे सोने लंपास, 8 आरोपी अटकेत

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव-चोर्ला मार्गावरील बैलूर क्रॉस परिसरात चित्रपटालाही लाजवेल असा थरारक दरोडा घडल्याने खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत पश्चिम बंगालमधील तीन सुवर्णकारांना लुटून तब्बल 30 लाख रुपयांचे सोने व रोख रक्कम लंपास करण्यात आली. या प्रकरणी खानापूर पोलिसांनी वेगाने तपास करत आठ आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस. के. इबादुल (34) हे आपल्या सहकाऱ्यांसह रबियुल गाजी आणि अली हुसेन मंडल यांच्यासोबत 20 मे रोजी कारने गोव्याकडे जात होते. सायंकाळी सुमारे 6.45 वाजण्याच्या सुमारास बैलूर क्रॉसजवळ दोन संशयित वाहनांनी त्यांच्या कारला अडविले. यानंतर सात ते आठ जणांच्या टोळीने तिघांना जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवून जंगल परिसरात नेले. आरोपींनी त्यांना मारहाण करत पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्याकडील 1 लाख 200 रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली.

दरम्यान, संबंधित तिघे सुवर्णकार असल्याची माहिती आरोपींना मिळाल्यानंतर त्यांनी अधिक सोन्याची मागणी केली. आरोपींनी रबियुल गाजी याला बेळगावातील शहापूर परिसरातील कार्यशाळेत नेऊन तेथून 205 ग्रॅम सोन्याचे बिस्किट तसेच 20 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणण्यास भाग पाडले. या संपूर्ण घटनेत आरोपींनी एकूण 225 ग्रॅम सोने आणि रोख रक्कम असा सुमारे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि हालचालींच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रबिऊल रोहूल आमीन गाझी (वय 29) – मूळ बाराहीपूर, दक्षिण 24 परगणा, पश्चिम बंगाल; सध्या दाणे गल्ली, शहापूर, बेळगाव, अलीहुसेन कबीरुद्दीन मंडल (वय 27) – मूळ माधवपुरा, तारकेश्वर, हुगळी, पश्चिम बंगाल; सध्या भारतनगर, खासबाग, सादीक अब्दुल रेहमान तोरगल (वय 37) – अळवण गल्ली, शहापूर, विवेक चंद्रकांत पाटील (वय 33) – महाद्वार रोड, तांगडी गल्ली, प्रशांत महादेव चव्हाण (वय 37) – कपिलेश्वर रोड, तांगडी गल्ली, नितीन राजाराम चव्हाण (वय 36) – गायत्रीनगर, खासबाग, दिगंबर नागेश पाटील (वय 26) – शिवशक्तीनगर, अनगोळ, मयुर राजू घाडी (वय 26) – बसवाण गल्ली, शहापूर, बेळगाव.

या प्रकरणी पीएसआय ए. ओ. निरंजनस्वामी यांनी गुन्हा नोंदविला असून, पोलीस निरीक्षक एल. एच. गौंडी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

या धाडसी दरोड्याच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, खानापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *