
बेळगाव : आंतरजातीय विवाह होणे हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी गरजेचे आहे. आपल्या देशातून जातीयता नाहीशा करायच्या असतील तर आंतरजातीय विवाहाचे आपण स्वागतच केले पाहिजे. कारण जातीयता समाज विकासाला बाधकच आहेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शिवाजी हसनेकर यांनी केले.
बेळगाव जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने जागर विवेकाचा या सदराखाली आयोजित केलेल्या व्याख्यानात आंतरजातीय विवाह काळाची गरज, या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
गिरीश कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड अनिल आजगावकर हे होते.
प्रारंभी अनिसचे कार्यकर्ते प्रा. अशोक आलगोंडी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व व्यासपीठावरील पाहुण्यांचे स्वागत केले.

श्रीयुत हसनेकर पुढे बोलताना म्हणाले, आंतरजातीय विवाहाला चालना देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1889 ला आपला दत्तक पुत्र डॉक्टर यशवंत फुले व सत्यशोधक समाजाचे नेते ज्ञानोबा कृष्णाजी ससाने यांची मुलगी राधा उर्फ लक्ष्मी तिच्याशी केला. हा विवाह आधुनिक भारतातील पहिला आंतरजातीय विवाह होता.
यापूर्वी संत बसवेश्र्वरांनी बाराव्या शतकात जाती अंतासाठी तत्कालीन समाज व्यवस्थेला व राज सत्तेला हादरवून टाकणारा आंतरजातीय विवाह लावून दिला. हे खूपच क्रांतिकारक आणि धाडसाचे होते.
राजर्षी शाहू महाराजांनी तर महात्मा फुले यांच्या विचाराने प्रेरित होऊन 1917 मध्ये आंतरजातीय विवाहचा कायदाच केला. फक्त कायदा करूनच ते थांबले नाहीत तर आपली चुलत बहीण चंद्रभागा हिचा विवाह कागलच्या धनगर घराण्यातील युवकाशी केला. याच्याही पुढे जाऊन शाहू महाराजांनी, कायदा करत असताना हिंदू जैन अशी 25 जोडप्यांची लग्न एकदम लावली. त्या काळात असे करणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखे होते.
याशिवाय महात्मा गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार इ. व्ही. राम स्वामी, सी. एन. अन्नदुराई या आणि यासारख्या समाजसुधारकांनी आंतरजातीय विवाहाला चालना देऊन समाजात समानता वाढीस लावली.

आपल्या पुराणात इतिहासात आंतरजातीय विवाह झाल्याची उदाहरणे आहेत तर मग आताच्या 21व्या शतकातील प्रगल्भ समाजात आंतरजातीय विवाह का होऊ नयेत? असा प्रश्न शेवटी त्यांनी उपस्थित केला.
याप्रसंगी अनिसचे कार्यकर्ते एस. आर. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर कॉम्रेड अनिल आजगावकर यांनी अध्यक्ष समारोप केला .
यावेळी इंद्रजीत मोरे, श्रीयुत ओऊळकर, मधु पाटील, संजय बंड, संजय मुतगेकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रा. अशोक आलगोंडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते जे. पी. आगशीमनी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta