
बेळगाव : कर्तव्यकसुर आणि विकास कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा अधिकाऱ्यांना बेळगाव जिल्ह्यात कार्य करण्याची संधी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे.
“विकास कामांसाठी आम्ही अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करत आलो आहोत. मात्र, प्रत्येक निर्णयासाठी मुख्यमंत्री किंवा आम्हीच सुचना देणे शक्य नाही. जर अधिकाऱ्यांनी विकासात उदासीनता दाखवली किंवा कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही, तर अशा अधिकाऱ्यांना जिल्ह्यातून हटवले जाईल, असे ”पत्रकारांशी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले.
जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी समजून काम करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे, तसेच जनतेच्या हिताचे संरक्षण करणे हे प्राथमिक कर्तव्य आहे. काही घटनांमध्ये पोलिस प्रशासन अपयशी ठरल्यामुळेच पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे, असेही जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
हिडकल जलाशयातून धारवाड औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी पुरवठा केला जात असून, यासाठी तीन विभागांनी आधीच परवानगी दिली आहे. धारवाडमधील केआयएडीबीमार्फत सुमारे 110 किमी लांब पाईपलाईन टाकून पाणी नेले जात आहे. मात्र, नेमकं किती पाणी नेले जाते याची माहिती उपलब्ध नाही. या संदर्भात बैठक घेऊन भविष्यात बेळगाव जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहिणार आहे असे जारकीहोळी यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta