
बेळगाव : शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर चौकादरम्यानच्या दुतर्फी मार्गावरील दुभाजकावर उभारण्यात आलेला टपरी बाजार प्रत्यक्षात धोबीघाट व मद्यपिंचा अड्डा बनल्याने परिसरातील नागरिक मद्यपींच्या गैरप्रकारामुळे हैराण बनले आहेत.
शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर चौका दरम्यानच्या दुतर्फी मार्गावरील दुभाजकावर 3 बाय 3 आकाराची छोटी दुकाने, छोट्या व्यावसायिकांसाठी उभारण्यात आली आहेत. या कामासाठी 6 कोटी 59 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. शहापूर खडे बाजार मार्गावर भाजी विक्री करणाऱ्या 136 भाजीविक्रेतांना या ठिकाणी टपऱ्या उपलब्ध करून दिला जाणार होत्या. टपरी बाजारामुळे स्थानिक नागरिक अथवा व्यापाऱ्यांवर गंडांतर येणार नाही. याउलट देशात मॉडेल ठरणारा हा टपरी बाजार, स्थानिक व्यापाऱ्यांना उत्तेजन देणारा ठरणार असल्याची ग्वाही बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली होती.
सदर टपरी बाजाराची काम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटून गेली आहेत. दुभाजकांवरील टपरी बाजार अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मोकळ्यावर असलेला हा बाजार रात्रीच्या वेळेत तळिरामांंना मोक्याचे ठिकाण बनला त्यातच या बाजाराच्या आजूबाजूस असलेल्या लोखंडी जाळ्यांचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जात आहे. जनतेच्या कररुपी पैशातून बांधण्यात आलेल्या टपरी बाजाराकडे महानगरपालिकेने साफ दुर्लक्ष केले आहे. धुळखात पडलेल्या या टपरी बाजाराचे लोकप्रतिनिधींना आता कोणतेच देणे घेणे दिसून येत नाही. याबद्दल नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta