
बेळगाव : नार्वेकर वैश्य समाज शिक्षण फंड संस्थेतर्फे वैश्यवाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम समादेवी मंगल कार्यालय येथे नुकताच पार पडला.
व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रोहन जुवळी, सचिव विक्रांत कुदळे, विश्वस्त मोतीचंद दोरकाडी, महिला मंडळ अध्यक्षा अंजली किनारी, समादेवी संस्थानचे उपाध्यक्ष सुयश पानारी, सचिव अमित कुडतूरकर, महादेव गावडे, रवी कलघटगी आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या म्हणून ज्ञान प्रबोधन शाळेच्या मुख्याध्यापिका मंजिरी रानडे उपस्थित होत्या.
प्रारंभी दीपप्रज्वलन झाले. परेश नार्वेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी मंजिरी रानडे यांनी यश व अपयश या शालेय जीवनाच्या दोन बाजू असतात. अपयशाने खचून न जाता आपली चूक ओळखून ती दुरुस्त केल्यास यश मिळते, असे त्या म्हणाल्या. त्यानंतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देण्यात आली. बालवाडी ते बारावीपर्यंतच्या २०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले. सूत्रसंचालन प्रसाद निखार्गे यांनी केले. विक्रांत कुदळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta