
बेळगाव : बँकॉक इंटरनॅशनल फुटबॉल स्पर्धा सुपर कप-२०२५ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होणाऱ्या बेळगाव शहरातील मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या (एमएसडीएफ) संघातील खेळाडूंना जर्सी वितरणासह शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
शहरातील एका तारांकित हॉटेलमध्ये गेल्या मंगळवारी आयोजित सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजु) सेठ उपस्थित होते. आमदारांच्या हस्ते बँकॉक इंटरनॅशनल सुपर कप-२०२५ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होणाऱ्या एमएसडीएफ संघातील खेळाडूंना जर्सी वितरण करण्यात आले. आमदार सेठ यांनी स्पर्धेमध्ये जय-पराजय ही महत्त्वाची असतेच. परंतु त्याहीपेक्षा स्पर्धेत भाग घेणे आणि पूर्ण क्षमतेने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करणे हे जास्त महत्त्वाचे असते असे सांगून एमएसडीएफ संघाला स्पर्धा जिंकून या, अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी अन्य मान्यवरांसह खेळाडूंनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
बँकॉक इंटरनॅशनल सुपर चषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एमएसडीएफ बेळगाव संघामध्ये हसन जमादार (कर्णधार), आराध्या नाकाडी, रायन सईद, समर्थ हिरेमठ, चैतन्य नाईक, धनसक, वंश पडवळेकर, अर्थीट, हुसेन जमादार व फहसूय (गोलरक्षक) त्यांचा समावेश आहे. या खेळाडूंच्या जर्सी वितरण कार्यक्रमाप्रसंगी मानस स्पोर्ट्सचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. थायलंड फुटबॉल संघटनेच्या ट्रेनिंग सेंटर फुटबॉल मैदानावर होणाऱ्या 12 वर्षाखालील साखळी व बाद पद्धतीच्या फुटबॉल स्पर्धेत संपूर्ण आशियातील 24 संघानी भाग घेतला आहे. या स्पर्धेसाठी चार गट करण्यात आले असून प्रत्येक गटात सहा संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारतासह इंडोनेशिया, मलेशिया, होंगकोंग, नेपाळ, सिंगापूर, जपान, व्हिएतनाम, फिलिपाईन्स व थायलंड या संघानी भाग घेतला आहे. या फुटबॉल संघाला फुटबॉल प्रशिक्षक रविशंकर मालशेट आणि मानस नायक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta