
बेळगाव : गणेशपूर मेन रोडवरील सैनिक क्वार्टर्ससमोर “कचरा फेकू नये” असा सूचना फलक लावलेला असतानाही, नेमक्या त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा टाकला जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, बेळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
गणेशपूर मेन रोडवरील सैनिक क्वार्टर्ससमोर लावलेल्या या सूचना फलकाजवळच गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात घरगुती कचरा टाकला जात आहे. टाकाऊ वस्तू, शिळे अन्न आणि अन्य कचरा प्लास्टिक पिशव्यांमध्ये बांधून सातत्याने येथे टाकला जात असल्याने, रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा मोठा ढिगारा साचला आहे.या साचलेल्या कचऱ्याची उचल करण्याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे, सध्या रस्त्याच्या या भागातून ये-जा करणाऱ्या पादचारी आणि दुचाकीस्वारांना दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून जावे लागत आहे.
दरम्यान, गणेशपूर मेन रोडवरील सैनिक क्वार्टर्ससमोरील रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा त्वरित उचलण्याचे आदेश महापालिका आरोग्य विभागाने द्यावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta