
बेळगाव : विद्यमान महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव अपात्रता प्रकरणी बुधवार दिनांक 11 रोजी सुनावणी होणार आहे असे मागील सुनावणी दरम्यान नगर विकास खात्याच्या सचिव दीपा चोळण त्यांनी सांगितले होते. त्या प्रकरणाची मागील सुनावणी पाच जून रोजी झाली होती त्यावेळी पुढील सुनावणी 10 जून रोजी होईल व त्यादिवशी अंतरिम निकाल देण्यात येईल असे नगर विकास खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र नगर विकास खात्याकडूनच सुनावणीची तारीख बदलण्यात आली असून 10 ऐवजी 11 जून रोजी नगरसेवक अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे त्या संदर्भात तक्रारदार सुजित मूळगुंद, महापौर मंगेश पवार, नगरसेवक जयंत जाधव यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या सुनावणीनंतरच महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात प्रादेशिक आयुक्तांच्या न्यायालयात सदर प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. 10 फेब्रुवारीला प्रादेशिक आयुक्तांनी विद्यमान महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांना अपात्र ठरवले होते त्यानंतर नगर विकास खात्याच्या सचिवांनी देखील प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला होता. मात्र प्रादेशिक आयुक्तांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली व पुन्हा या प्रकरणाची सुनावणी करण्याचे अधिकार उच्च न्यायालयाने नगर विकास खात्याकडे दिले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta