Sunday , December 7 2025
Breaking News

‘वेगा हेल्मेट’ कंपनीच्या कर थकबाकीवरून महापालिका बैठकीत वादळी चर्चा

Spread the love

 

सखोल चौकशी करून रक्कम वसूल करा ; महापौर मंगेश पवार यांचे निर्देश
बेळगाव : बेळगावातील प्रतिष्ठित ‘वेगा हेल्मेट’ कंपनीने महापालिकेला सात कोटींहून अधिक रुपयांची करचुकवेगिरी केल्याच्या आरोपावरून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि ती रक्कम वसूल करावी, असे निर्देश महापौर मंगेश पवार यांनी दिले.

मंगळवारी बेळगाव महापालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. महापालिकेच्या सदस्यांनी यापूर्वीच यावर चर्चा केली आहे, असे सांगून महापौरांनी कायद्यानुसार पालिकेला मिळणारी थकबाकी वसूल करण्याचे निर्देश दिले. यावर सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी यांनी सांगितले की, वेगा कंपनीचे प्रतिनिधी ‘जुळवून घेण्यासाठी’आले होते. मात्र, त्यांना तशी संधी न देता थेट कर वसूल करावा, असे त्यांनी म्हटले.

नगरसेवक शाहीन पठाण यांनी यावर वेगळे मत मांडले. ते म्हणाले की, वेगा एक मोठी कंपनी आहे आणि बेळगाव शहरातील अनेक लोकांना तेथे रोजगार मिळाला आहे. त्यामुळे त्यांना थोडी मुदत द्यावी, अशी विनंती त्यांनी सभेला केली. यावर भाजप सदस्य रवी धोत्रे यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, “बेळगाव शहरात अनेक मोठ्या कंपन्या आहेत. वेगा कंपनीला वेळ दिला, तर इतर कंपन्याही याच मार्गाचा गैरवापर करतील. वेगा कंपनी सुमारे पाच देशांमध्ये व्यवसाय करते. त्यामुळे एकाच वेळी कराची संपूर्ण रक्कम वसूल करा.” यावर महसूल विभागाच्या उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांनी बोलताना सांगितले की, वेगा कंपनीला यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली आहे. लवकरच थकबाकीची रक्कम वसूल केली जाईल.

बेळगाव महापालिकेशी संबंधित ‘वेगा हेल्मेट’ कंपनीच्या या ७ कोटींहून अधिकच्या करचुकवेगिरी प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. महापौरांनी चौकशीचे आदेश दिले असले आणि अनेक नगरसेवकांनी कठोर कारवाईची मागणी केली असली, तरी या मोठ्या कंपनीकडून थकबाकी वसूल करण्यात महापालिका यशस्वी होते का आणि यात कोणतीही ‘जुळवाजुळव’ न होता दोषींवर कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बेळगावच्या तिजोरीला कोट्यवधींचा फटका बसवणाऱ्या या प्रकरणाचा शेवट कसा होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी भाषेतील स्वागत फलक कन्नड संघटनांकडून टार्गेट!

Spread the love  बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येणाऱ्या मंत्री आणि आमदारांच्या स्वागताकरिता भाजपाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *