
बेळगाव : आझम नगरच्या केएलई कंपाऊंडजवळील पहिला क्रॉस अक्षरशः कचरा डेपोसारखा दिसू लागला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिक महापालिकेच्या दुर्लक्षाला जबाबदार धरत आहेत.
आझम नगरला महापालिकेकडून पूर्णपणे दुर्लक्षित केले जात आहे. कचरा उचलणारी गाडी दररोज येत नाही. त्यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. गाडी तीन दिवसांतून एकदा येते. परिणामी, रस्त्यावर पडलेला कचरा सर्वत्र पसरतो. लोकांना आणि वाहनांना यामुळे खूप त्रास होत आहे. दिवसभर भटक्या कुत्र्यांकडून कचऱ्याच्या पिशव्या फाडल्या जातात, ज्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. या घाणीमुळे संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. कचरा गाडी दररोज यावी यासाठी अनेकदा सांगितले असूनही, त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. पथदिवेही दररोज लागत नाहीत, आठवड्यातून दोन-तीन दिवस दिवे बंद असतात.
याशिवाय, आझम नगरमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या १०० हून अधिक झाली आहे. त्यापैकी काही कुत्रे पिसाळलेली आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या मागे लागून चावा घेण्याच्या घटना घडत आहेत. या कुत्र्यांना पकडून जंगलात सोडावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. याबद्दल आम्ही तोंडी तक्रार महापालिकेकडे केली आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
Belgaum Varta Belgaum Varta