
बेळगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बेळगाव यांच्यावतीने शुक्रवार दिनांक 20 जून रोजी “युद्ध नको बुद्ध हवा” या विषयाला अनुसरून प्राचार्य आनंद मेणसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे कार्यकर्ते अर्जुन चौगुले होते. प्राचार्य आनंद मेणसे यांनी आपल्या व्याख्यानात गेल्या अनेक दशकापासून इस्त्रायल व पॅलेस्टाईन यांच्यामध्ये चालू असलेल्या युद्धाचे त्या त्या देशांमध्ये झालेले गंभीर परिणाम याचा आढावा घेतला. दुसऱ्या जागतिक महायुद्धात अमेरिकेने जपानवर टाकलेले अणुबॉम्ब, त्याचा तेथील मानवी जीवनावर, मानवी आरोग्यावर व शेतीवर झालेला परिणाम स्पष्ट केला. गेली अडीच वर्षे रशिया व युक्रेन या युद्धामुळे रशियाची जागतिक पत, प्रतिष्ठा कशी खालावली. ज्यामुळे जागतिक राजकारणाचा रशियाला झालेला त्रास कथन केला. सध्या सुरू असलेले इस्त्रायल व इराण या युद्धा पाठीमागची पार्श्वभूमी कथन करताना अमेरिकेने घेतलेली दुटप्पी भूमिका व जगाच्या राजकारणात रशियाची झालेली वाताहत त्याचा अमेरिकेने उचललेला फायदा स्पष्ट केला. सध्या सुरू असलेल्या इस्त्रायल व इराण या युद्धाचे भारतावर काय परिणाम होतील याचाही दाखला दिला. या सर्व युद्धांचा संदर्भ देत आजच्या आधुनिक कालखंडात मानव जातीच्या विनाशाला व पृथ्वीच्या नाशाला ही युद्धे कशी कारणीभूत ठरतील हे स्पष्ट केले. आजच्या काळात मानव जातीचा उद्धार व पृथ्वीचे अस्तित्व टिकवावयाचे असेल तर अहिंसेचे पुजारी व शांतीचे उपासक गौतम बुद्ध याच्या विचारांचा व तत्वज्ञानाचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे अन्यथा आपला विनाश अटळ असल्याचे भाकीत मेणसे सरांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना अर्जुन चौगुले यांनी गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा परामर्श केला व सध्या जगात शांतता नांदण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने योग्य ती भूमिका घेणे आवश्यक्य असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मयूर नागेनहट्टी यांनी केले. यावेळी अंनिस कार्यकर्ते श्री. शंकर चौगुले, नागेश सातेरी, समाजसेवक शिवाजी दादा कागणीकर, मधुकर पाटील, अनिल आजगावकर, इंद्रजीत मोरे, ज्योतिबा आगसमणी, संजय मेणसे, निलेश शिंदे इत्यादी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta