बेळगाव : ५ राज्यांतील काँग्रेसच्या पराभवाला मतांचे विभाजन हेच कारण आहे. पण कर्नाटकात आम्हाला संधी आहे. काँग्रेसमुक्त कर्नाटक करणे कोणालाही शक्य नाही असा दावा केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केला.
बेळगावातील काँग्रेस भवनात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसच्या ५ राज्यातील निवडणुकांतील दारुण पराभवावर आ. सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, मतांच्या विभाजनामुळेच काँग्रेसचा पराभव झाला आहे. हे काही नवीन नाही. याआधीही २-३ राज्यांत यामुळेच आमचा पराभव झाला होता. स्थानिक आणि त्या-त्या राज्यांतील समस्याही काँग्रेसच्या पराभवास कारण ठरल्या. मध्यप्रदेश, राजस्थानात आम्ही जिंकलो होतोच. एक निवडणूक झाली म्हणजे संपले असे नाही. निवडणूक वारंवार होत राहतात. हे चालायचेच असे जारकीहोळी म्हणाले. नेतृत्वाच्या अभावामुळे काँग्रेस हरतेय का? या पत्रकारांच्या प्रश्नावर जारकीहोळी म्हणाले, काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव नाही. आमची पीछेहाट तात्पुरती आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यावर जबाबदारी अधिक आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्ष पुढे जाईल. भाजप धर्माच्या आधाराने जातीय दंगली घडवून निवडणूक लढवितो. बदल घडविण्याची काँग्रेसला ही खरी संधी आहे. हा पराभव एक धडा मिळाल्यासारखं आहे. भाजप खोत बोलतो, पण रेटून बोलतो. त्यामुळे लोकांना ते खरे वाटते. ते बदलण्यासाठी वेळ लागेल. कर्नाटकात आम्ही भक्कम आहोत. अन्य राज्यांची तुलना कर्नाटकाशी करू नये असे ते म्हणाले. कर्नाटकात येत्या निवडणुकीत 130 जागा जिंकू असा दावा भाजप नेते करत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना जारकीहोळी म्हणाले, आता त्यांच्याकडे 70-80 जागा आहेत. अंतर्गत भांडणे सगळीकडेच असतात. अन्य राज्यातही आहेत. पण आम्ही आता सिद्ध आहोत. भाजपला सत्तेवर यायला 100 वर्षे लागली. टप्प्याटप्प्याने तेही वर आलेत. आम्हीही टप्प्याटप्प्याने खाली गेलो. पण आता टप्प्याटप्प्याने वरही येऊ. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसला ही एक संधी आहे असे ते म्हणाले. यावेळी राज्यसभा सदस्य एल. हनुमंतय्या म्हणाले, ५ राज्यातील पराभव काँग्रेसने मान्य केला आहे. परंतु पुढील काळात काँग्रेस सत्ता नक्की मिळवेल. अ. भा. काँग्रेस समितीने पाठविलेल्या अधिकाऱ्यांच्या समक्ष पक्ष सदस्यत्व नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी जनतेने काँग्रेस कार्यकर्ता असल्याप्रमाणे साथ दिली आहे. १०-१५ वर्षांपासून काँग्रेसचा अनेक राज्यात पराभव झाला आहे. परंतु यापुढेही जनतेच्या साथीने काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल. मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये आम्ही सत्ता मिळवली आहे. कर्नाटकातही कोणत्याही परिस्थितीत पुढील निवडणुकीत काँग्रेसच सत्तेवर येईल. दर ३ वर्षांनी काँग्रेस सदस्यत्व नोंदणी अभियान राबवते. सध्याही ते सुरु असून निवडणुकीच्या तयारीचाच एक भाग आहे असे त्यांनी सांगितले. एकंदर ५ राज्यातील दारुण पराभवानंतरही काँग्रेसने न खचता पुन्हा भरारी घेण्याचा निर्धार केला आहे. यात त्यांना कितपत यश येते हे काही काळातच कळेल.
Check Also
मराठी विद्यानिकेतन स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये ऐनवेळी बदल
Spread the love बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेचे स्नेहसंमेलन 27 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी …