
बेळगाव : भारतीय टपाल खात्याने देशभरातील ग्राहकांना जलद सेवा देण्यासाठी ‘अॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी 2.0’ लागू केली आहे. याच नव्या सेवेचा आज बेळगावच्या प्रधान टपाल कार्यालयात शुभारंभ करण्यात आला.
बेळगाव प्रधान टपाल कार्यालयाचे अधीक्षक एस.के. मुरनाळ, सहायक अधीक्षक एस.डी. काकडे, बी.पी. माळगे आणि पोस्टमास्टर लक्ष्मण चावडीमनी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ‘एपीटी 2.0’ सेवेचे लोकार्पण झाले.

यावेळी माहिती देताना प्रधान टपाल कार्यालयाचे अधीक्षक एस.के. मुरनाळ यांनी सांगितले की, ‘एपीटी 2.0’ च्या उद्घाटनामुळे ग्राहकांना उच्च दर्जाची टपाल सेवा मिळेल. यामुळे टपाल योग्य वेळेत पोहोचण्यास मदत होईल आणि सर्व व्यवहार जलद गतीने पूर्ण होतील. तसेच, क्यूआर कोड पेमेंट, स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय मेल यासह इतर सेवा आधुनिक पद्धतीने पुरवल्या जातील. उद्या धारवाड आणि बैलहोंगल येथील प्रधान टपाल कार्यालयांमध्येही ही सेवा सुरू होईल, असे त्यांनी नमूद केले. या सोहळ्याला ग्राहक, टपाल खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta