
बेळगाव : सालाबाद प्रमाणे या वर्षी ही मराठा मंडळ शिक्षण संस्थेतर्फे आंतरशालेय भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मराठा मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव, येथे करण्यात आले आहे.
मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे तात्कालिन अध्यक्ष शिक्षण महर्षी कै. श्री नाथाजीराव हलगेकर यांचा 22 जूलै हा स्मृतीदिन “शैक्षणिक उपक्रम दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दरवर्षी या दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक व्याख्यानांचे व चर्चा सत्रांचे आयोजन केले जाते. जेणेकरून आधुनिक शिक्षणाच्या रूंदावत चाललेल्या कक्षा शिक्षकवर्गाला आत्मसात करता याव्यात व नव्या उमेदीने, ज्ञान दानाचे कार्य त्यांनी करावे, शिवाय दिवंगत कै. श्री नाथाजीराव हलगेकर याच्या आठवणींना उजाळा मिळावा हा या पाठीमागचा हेतू असून 22 जुलै हा कै. श्री नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांचा स्मृतिदिन गेले 19 वर्षे शैक्षणिक उपक्रम दिन म्हणून साजरा करण्यात येतो..
या दिनाचे औचित्य साधून या वर्षी देखील विद्यार्थ्यांच्या संभाषण कलेला वाव देण्यासाठी भव्य अशा आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक 17 जुलै 2025 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता भातकांडे सभागृह, मराठा मंडळ चव्हाट गल्ली, येथे करण्यात आले असून या स्पर्धेतून विजयी स्पर्धकांना आकर्षक चषकासह रोख बक्षीसही दिली जाणार आहेत.
स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे
1) ई-कचऱ्याचा नाश, हिरव्या भविष्याचा प्रकाश!
2) तिसऱ्या महायुद्धाच्या वणव्यात मानवतेची घुसमट…!
3) शिक्षणासाठी वाहिलेली जीवन धारा…… शिक्षण महर्षी नाथाजीराव हलगेकर!
सदर स्पर्धा (माध्यमिक विभाग मराठी व इंग्रजी माध्यम) आंतरशालेय असून एका शाळेतून फक्त दोनच स्पर्धक विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या शिफारसीसह सहभागी होऊ शकतात.
आधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9972713176 वर संपर्क साधावा.

Belgaum Varta Belgaum Varta