
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एका शिष्टमंडळाने आज सकाळी कोल्हापूर मुक्कामी भारताचे माजी कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष खासदार श्री. शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सीमा प्रश्न व मराठी माणसाच्या समस्यांबाबत चर्चा केली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकांमध्ये सभासदानी व्यक्त केलेल्या भावनांची त्यांना माहिती करून देण्यात आली. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या उच्चाधिकार समितीच्या सभासदांची लवकरात लवकर बैठक घेऊन सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी याबाबत प्रयत्न करण्याची विनंती केली त्याचप्रमाणे सीमा प्रश्नाच्या संदर्भात सरकारच्या वतीने नेमण्यात आलेल्या तज्ञ समितीची ही पुनर्रचना करावी तसेच या समितीचे अध्यक्ष म्हणून मध्यवर्तीच्या ठरावाप्रमाणे श्री. जयंतराव पाटील यांची नेमणूक करावी याबाबत प्रयत्न करण्याची विनंती करण्यात आली शिष्टमंडळाबरोबर चर्चा करताना श्री. शरदरावजी पवार यांनी उद्या आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करतो अशा प्रकारचे आश्वासन दिले. कोल्हापूर येथे मध्यवर्ती समितीच्या शिष्टमंडळात माजी आमदार श्री. मनोहर किनेकर (कार्याध्यक्ष), माजी महापौर श्री. मालोजी अष्टेकर (सरचिटणीस), श्री. प्रकाश मरगाळे (खजिनदार), श्री. एम जी पाटील चिटणीस तालुका म. ए. समिती व श्री. सुनील आनंदाचे यांचा समावेश होता. कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही त्यांनी शिष्टमंडळाची भेट घेतल्याचे व मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta