
बेळगाव : राज्यातील गोरगरिबांसाठी घरे देण्याच्या नावाखाली काँग्रेस सरकार भ्रष्टाचार करत आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टी बेळगाव शाखेने काँग्रेस सरकारवर केला असून राज्य सरकारच्या विरोधात आज बेळगाव येथील चन्नम्मा चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली राणी चन्नम्मा चौकातून भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा पंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला व राज्य काँग्रेस सरकारच्या विरोधात निदर्शने केली. जिल्हा पंचायत कार्यालयासमोरच आंदोलनकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी बोलताना भाजप जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेस सरकार गरिबांना घरे देण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार करत आहे. काँग्रेस सरकारचा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील यांनी केली.
यावेळी भाजप महानगर जिल्हा अध्यक्षा गीता सुतार, भाजप नेते संकल्प शेट्टर, जिल्हा सरचिटणीस संदीप देशपांडे, मल्लिकार्जुन मादामनावर, राज्य महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माध्यम प्रमुख सचिन कडी, हनुमंत कोंगाळी, एससी मोर्चा जिल्हा अध्यक्ष यल्लाप्पा कोलकार, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष देशमुख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महांतेश चिन्नपगौडर, सोशल मीडिया सहसंयोजक मनोज पाटील, धनंजय जाधव, प्रशांत अम्मीनभावी, श्रीधर कुलकर्णी, बसवराज सानिकोप, ज्योती शेट्टी, श्वेता जगदाळे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta