Saturday , December 13 2025
Breaking News

श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनतर्फे रविवारी भक्तिरसपूर्ण “अभंगवाणी” गायन कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन यांच्यावतीने रविवार दिनांक 6 जुलै रोजी सायंकाळी 5.00 वाजता ओरिएंटल शाळेच्या सभागृहात खास आषाढी एकादशीच्या निमित्ताने गायक श्री विनायक मोरे, सौ अक्षता मोरे आणि सहकाऱ्यांचा “अभंगवाणी” गायनाचा भक्तीरसपूर्ण संगीत कार्यक्रम आयोजित केला आहे. संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत कान्होपात्रा, संत विष्णुदास, संत तुलसीदास, संत पुरंदरदास आदि अनेक संतांनी रचलेले अभंग तसेच भक्तिगीते यावेळी सादर होणार आहेत.
कलाकारांचा परिचय –
श्री. विनायक मोरे हे संगीत विद्वान पं. नंदन हेर्लेकर यांचे पट्टशिष्य असून विविध शिक्षण संस्थांमधून संगीत अध्यापन करतात. अनेक ठिकाणी त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. 2001 साली त्यांनी स्वरांजली संगीत संस्थेची सुरूवात करून त्याअंतर्गत अनेक संगीत उपक्रम राबविले. एकाचवेळी हजारों विद्यार्थांना समूहगायन शिकविण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन दशेत त्यांनी पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, मिरज, जयसिंगपूर, देवगड, गोवा, उजैन, भुवनेश्वर, बेंगळूर, मैसूर, हुबळी, धारवाड आदी ठिकाणच्या अनेक नामवंत स्पर्धांमधून असंख्य पारितोषिके मिळविली आहेत.
विशेष म्हणजे 2006 मध्ये त्यांनी बेळगावमधील विविध 28 शाळांच्या 10,000 विद्यार्थांना एकत्रित करून त्यांच्या समूहगायनाचा ‘सूरमयी भारत’ कार्यक्रम युनियन जिमखान्याच्या मैदानावर केला. 2016 साली 15,000 विद्यार्थ्यांचा देशभक्ती समूहगायनाचा कार्यक्रम करून त्यांनी जागतिक विश्वविक्रम नोंदविला. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात 1,000 विद्यार्थ्यांचे संपूर्ण वंदे मातरम् तसेच विश्व कन्नड संमेलनात 1,000 विद्यार्थ्यांचे समूहगायन त्यांनी प्रस्तुत केले. वृद्धाश्रम, अनाथाश्रम, मतिमंद, अंध, अंगविकलांग, एचआयव्हीग्रस्त यांना त्यांनी विविध स्फूर्तीगीते शिकवून त्यांना एकाच व्यासपीठावर आणले व त्यांच्या समूहगायनाचा विशेष कार्यक्रम केला. हिंडलगा कारागृहातील कैद्यानांही त्यांनी संगीताचे धडे दिले आहेत. शहरातील बी. एड्. महाविद्यालयांमधून ‘शाळेत संगीत विषय कसा शिकवावा’ याबाबत त्यांनी दरवर्षी कार्यशाळा घेऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. अनेक संघ-संस्थांनी त्यांना संगीत क्षेत्रातील योगदानामुळे विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे. भारत विकास परिषद बेळगांव शाखेचे ते अध्यक्ष आहेत.
सौ अक्षता मोरे – यांनी आपले वडील श्रीनिवास नायक यांच्याकडून संगीताचे बाळकडू घेतले. गोवास्थित काका पं. रामराव नायक यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. विनायक मोरे यांच्या त्या पत्नी असून त्यांच्याकडून संगीताचे मार्गदर्शन घेत आहेत. त्या एम्.ए.बी.एड्. पदवीधर असून अनेक ठिकाणी त्यांनी आपले गायन प्रस्तुत केले आहे. स्वरांजली संगीत संस्थेच्या त्या संचालिका आहेत.
रविवारी होणाऱ्या स्वरांजली “अभंगवाणी” कार्यक्रमाला सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री तुकाराम महाराज ट्रस्टच्यावतीने श्री. प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *