Sunday , July 26 2026
Breaking News

इंगळी येथील गोरक्षकांवरील हल्ल्याचा निषेधार्थ श्रीराम सेनेकडून निदर्शने

Spread the love

 

बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इंगळी येथे गोरक्षकांना झाडाला बांधून केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज श्रीराम सेनेने ‘इंगळी चलो’ आंदोलनाचे आयोजन केले होते. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर इंगळी गावाकडे निघालेल्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बेळगावात हजारोच्या संख्येने श्रीराम सेनेचे कार्यकर्ते या निदर्शनात सहभागी झाले होते. त्यांनी एक भव्य रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेला.

यावेळी बोलताना श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक म्हणाले की, “गाय या समाजाला अनेक प्रकारे योगदान देते, परंतु तिची हत्या करणे योग्य नाही. गाईचा शाप खूप वाईट असतो. गोरक्षकांवरील हल्ला प्रकरण मागे घेणे हे सरकारसाठी उलटसुलट ठरेल. इंगळीची घटना व्हायरससारखी पसरण्यापूर्वीच सरकारने सावधगिरी बाळगावी. आम्ही प्रतीकात्मक स्वरूपात इंगळीला जाण्यास तयार आहोत. इंगळीमध्ये गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्या सर्वांना अटक व्हायलाच हवी.

श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर कुलकर्णी म्हणाले की, “राज्यात गोहत्या बंदी आणि गोसंरक्षण कायदा लागू आहे. तरीही, गायींची वाहतूक आणि हत्या थांबलेली नाही. हे थांबवण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांना पोलीस धमकावत आहेत. राज्यात कुठेही गायींची अवैध वाहतूक दिसल्यास, पोलिसांना माहिती द्या; पोलीस न आल्यास श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना कळवा. गोसंरक्षणासाठी श्रीराम सेना रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. गोसंरक्षण न केल्यास सरकारला योग्य उत्तर दिले जाईल,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

बेळगाव श्रीराम सेनेचे प्रमुख रविकुमार कोकितकर यांनीही हुक्केरी तालुक्यातील इंगळी येथे गोरक्षकांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर श्रीराम सेनेचे कार्यकर्ते हुक्केरी तालुक्यातील इंगळीकडे जाण्यासाठी निघाले असता, पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर पोलिसांनी प्रमोद मुतालिक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *