
बेळगाव : महानगरपालिकेच्या विरोधी गटाच्या एका नगरसेवकाने अद्याप आपल्या मिळकतीचा तपशील सादर केलेला नाही. बेळगाव महानगरपालिकेच्या 58 नगरसेवकांच्या मिळकतीची माहिती मिळविण्यासाठी माहिती कायदेअंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला आहे. संबंधित अर्जधारकांना 2021 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी अर्ज दाखल करताना सादर केलेले प्रतिज्ञापत्र व त्यात नमूद केलेली मिळकतीचा तपशील त्याचप्रमाणे मागील दोन वर्षातील आर्थिक मिळकतीचा तपशील संबंधित अर्जधारकांना हवा आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांच्या मिळकतीच्या माहितीचा तपशील जमा करण्याची मोहीम राबविली आहे. सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवकांनी आपल्या मिळकतीचा तपशील महानगरपालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांकडे दिला आहे मात्र विरोधी गटातील दोन नगरसेवकांनी आपल्या मिळकतीचा तपशील देण्यास टाळाटाळ केली होती. त्यातील एका नगरसेवकाने आपल्या मिळकतीचा तपशील महानगरपालिकेत दिला आहे मात्र अद्याप एका नगरसेवकाने आपल्या मिळकतीचा तपशील सादर केलेला नाही. यासंदर्भात नगरविकास खात्याकडे जर तक्रार दाखल झाली तर सदस्यत्व रद्द होण्याची भीती आहे. महानगरपालिकेच्या लोकनियुक्त नगरसेवकांनी आपल्या मिळकतीचा तपशील लोकायुक्तांकडे सादर करावा लागतो. 2024-25 या वर्षाचा मिळकत तपशील सादर करण्याची लेखी सूचना नगरसेवकांना फेब्रुवारी महिन्यातच देण्यात आली होती. महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांनी देखील आपल्या मिळकतीची माहिती सादर केली आहे. पण त्या तपशिलात त्यांनी खाऊ कट्ट्यामधील दुकान गाड्यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती लपवल्याची तक्रार देखील झाली आहे. मिळकतीची माहिती सादर केली नाही किंवा चुकीची माहिती सादर केली गेली तर महापालिका कायद्याअंतर्गत कलम 19 अन्वये यांच्यावर देखील कारवाई होऊ शकते. या कलमानुसार संबंधित नगरसेवकांचे पद रद्द होऊ शकते.

Belgaum Varta Belgaum Varta